Breaking News

जिल्हा क्रीडा संकुलाला कुणी वालीच नाही

राज्याच्या क्रीडा धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा संकुल बाधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. बहुतेक जिल्ह्यांमध्ये क्रीडा संकुले बांधून पूर्ण झाली आहेत. रायगड जिल्हा क्रीडासंकुल बांधण्यात आले. अनेक वर्ष या संकुलाचे काम थांबले होते. त्यानंरत इनडोअरचे काम पूर्ण करण्यात आले. आऊटडोअर करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या क्रीडासंकुलाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर खर्‍या अर्थाने हे क्रीडासंकुल खेळाडूंसाठी खुले झाले. सध्या या क्रीडासंकुलाची दुरवस्था आहे. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने हे क्रीडासंकुल ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यात दुरुस्ती करण्यात आलेली नसल्यामुळे या संकुलातील बराचसा भाग सध्या वापराविना पडून आहे. त्याची दुरुस्तीच होत नाही. कुणाला त्याचे काही पडलेले नाही. या क्रीडासंकुलाला कुणी वालीच नाही.

रायगड जिल्ह्याचे क्रीडासंकुल बांधण्यासाठी 1985 साली आलिबाग तालुक्यातील नेहुली येथील 10 एकर जागा संपादित करण्यात आली. त्यानंतर या जागेवर संरक्षण भिंत बांधण्याव्यतिरिक्त कोणतेही काम झाले नव्हते. 2001 सालच्या क्रीडा धोरणानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा संकुल बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. 2003 साली काढण्यात आलेल्या राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार रायगड जिल्हा क्रीडा संकुलासाठी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यात 400 मीटर धावण्याचा ट्रॅक, इनडोअर क्रीडाप्रकारांसाठी हॉल, विविध खेळांची मैदाने, तरणतलाव, व्यायामशाळा, प्रेक्षागॅलरी यांचा समावेश होता. या पहिल्या टप्प्याच्या कामाला 2005 साली प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. 2009 साली हे काम पूर्ण झाले. 15 ऑगस्ट 2009 रोजी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

2009 साली शासनाने दुसरा अध्यादेश जाहीर केला. या क्रीडा संकुलांच्या कामासाठी मंजूर केलेला निधी पुरेसा नसल्याचे शासनाच्या लक्षात आले. त्यामुळे या क्रीडा संकुलासाठी आणखी चार कोटी 78 लाख रुपये मंजूर करण्यात आले. 2009 सालापासून इनडोअर हॉलमध्ये विविध शालेय स्पर्धा येथे घेण्यात आल्या. 2011 पासून दुसर्‍या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले. आऊटडोअरचे काम पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या क्रीडासंकुलाचे उद्घाटन करण्यात आले. या क्रीडासंकुलामुळे शासकीय क्रीडास्पर्धांसाठी एक हक्काचे मैदान उपलब्ध झाले. अनेक स्थानिक क्रीडास्पर्धा या मैदानावर होऊ लागल्या, परंतु हे क्रीडासंकुल म्हणजे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगासाठी हक्काची जागा झाली आहे.

लोकसभा आणि पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे मतमोजणीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या नेहूली येथील जिल्हा क्रीड संकुलाची मात्र दयनीय अवस्था झाली आहे. लोकसभेच्या निवडणूक काळात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी क्रीडासंकुलाचा ताबा घेत इव्हीएम ठेवण्यासाठी स्ट्राँगरूम तयार केली. त्यामुळे जवळ जवळ दोन महिने हे क्रीडा संकुल खेळाडूंसाठी बंदच झाले. खेळाडू सोडा जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांना देखील काही परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे वापराविना जलतरण तलावाची तर अत्यंत वाईट अवस्था झाली. वापराविना मोठया प्रमाणावर शेवाळ झाल्याने एवढी भयानक अवस्था झाली होती की तीन तीन पाण्याचे पंपदेखील नादुरुस्त झाले. मतमोजणीमुळे निवडणूक अधिकार्‍यांनी ताबा घेतल्याने इनडोअरमधील कुस्तीच्या महागड्या मॅटस् बाहेरच पडून होत्या. अशीच अवस्था बॅडमिंटन हॉलची आहे. बॅडमिंटन कोर्ट नादुरुस्त आहे, जर हे संकुल निवडणूक आयोग हक्काने ताब्यात घेते, तर त्यामुळे जी मोडतोड झाली असेल त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला निधी निवडणूक आयोगाने तातडीने उपलब्ध करून दिला पाहिजे. क्रीडासंकुल हे खेळासाठी आहे. ज्या उद्देशाने हे संकुल बांधण्यात आले त्या उद्देशासाठी त्याचा वापर होत नसेल, तर त्याचा काय उपयोग. मतदानयंत्र ठेवण्यासाठी  आणि मतमोजणीसाठी जर तीन महिने क्रीडासंकुल खेळाडूंसाठी बंद ठेवण्यात येणार असेल, तर  खेळाडूंनी खेळायचे कुठे.

वास्तविक या संकुलाची उत्तम देखभाल होणे आवश्यक आहे, परंतु त्याकडे कुणी लक्षच देत नाही. पासाळ्यात या संकुलामध्ये मोठ्या प्रमाणावर गवत वाढले होते. जेे काही दिवसांपूर्वी कापण्यात आले. तरीदेखील इनडोअर हॉल, व्यायामशाळा, तरणतलाव यांच्यामागे झुडपे वाढली आहेत. येथे सरपटणारे प्राणी फिरत असतात. हा परिसर स्वच्छ करायला हवा. संकुलात पाण्याची समस्या आहे. ती दूर व्हायला हवी. आजही या संकुलामध्ये खेळाडूंसाठी आवश्यक असलेल्या सुविधा नाहीत. त्या पूर्ण करण्यासाठी  कुणी प्रयत्नच करत नाही. करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या या संकुलाचा बाराचसा भाग हा वापराविना पडूनच आहे. त्याची कुणालाच खंत वाटत नाही. या संकुलाला कुणी वालीच नाही.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply