Breaking News

उपजिल्हा रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा

खालापूर : प्रतिनिधी

तालुक्यात अद्यावत सुसज्ज शासकीय रुग्णालय नसल्याने अपघातातील जखमींना तसेच आजारी रुग्णांना उपचारासाठी मुंबई-पुणे येथे हलवावे लागत आहे, मात्र  खालापुरात उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले असून, त्यासाठी आवश्यक जमिनीची पूर्तता महसूल विभागाने केल्याने लवकरच खालापुरात शासकीय रुग्णालय उभे राहणार आहे.

मुंबई व पुणे या दोन महानगरांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या खालापूर तालुक्यातून मुंबई- पुणे महामार्ग, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग तसेच खोपोली- पेण, खोपोली-पाली, सावरोली -खारपाङा, चौक-कर्जत, खालापूर-पळसदरी मार्गे कर्जत असे महत्त्वाचे राज्यमार्ग जातात. या ठिकाणी अपघाताचे सर्वाधिक प्रमाण आहे.  वाढत्या औद्योगिक वसाहतींमुळे खालापुरातील लोकसंख्याही वाढली. खालापुरात दिवसाला सरासरी तीन अपघात होत असून, रस्ते अपघाताची आकडेवारी चिंताजनक आहे. अपघातानंतर तातडीच्या उपचारासाठी खालापूर तालुक्यात सर्व सोयीसुविधांयुक्त सुसज्ज रुग्णालय नसल्याने रुग्णाला पनवेल, नवी मुंबई किंवा पुण्यातील रुग्णालात हलवावे लागते.

खोपोली नगरपालिकेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व खालापुरातील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रथमोपचारापुरते मर्यादित असून तेथे अत्यावशक औषधांचा तुटवडा, अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची कमतरता आहे. त्यामुळे गंभीर जखमींना किंवा रुग्णाला तेथील डॉक्टर तातडीने पनवेल, नवी मुंबई, पुणे येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देतात. वेळेत उपचार न झाल्याने अनेक रुग्ण दगावले आहेत.

खोपोली शहरात किंवा खालापुरात मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज रुग्णालय उपलब्ध व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून सर्वच स्तरातून होत होती. तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनादेखील याबाबत वेळोवेळी निवेदने देण्यात आली होती. त्यानंतर आता खालापूर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे.

नियोजित उपजिल्हा रुग्णालयासाठी खालापुरातील देवन्हावे ग्रामपंचायत हद्दीतील इसांबे फाटा येथे अडीच एकर जागा उपलब्ध झाली असून, तांत्रिक अडचणी दूर करून जागेचे आरोग्य विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले आहे.

-इरेश चप्पलवार, तहसीलदार, खालापूर

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply