वडखळ ब्रिजवर अज्ञातांनी रोखली बसचालकावर बंदूक
पाली : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेण तालुक्यातील वडखळ ब्रिजवर एका कंपनीच्या बसचालकावर अज्ञातांनी बंदूक रोखली असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वडखळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळा कुंभार यांनी या थरारक घटनेची माहिती दिली.
एक कार आणि जेएसडब्ल्यू कंपनीचा बसचालक या दोघांच्या वाहनांची पेणमध्ये घासाघीस झाली. त्यानंतर कारचालक बसचा पाठलाग करू लागले. वडखळ येथे कार बसच्या आडवी लावून अज्ञात दोन जण बसमध्ये चढले व त्यांनी शिवीगाळ करीत बसचालकावर बंदूक रोखल्याचे पोलिसांनी सांगितले.
या वेळी बसमधील प्रवासी जीव मुठीत घेऊन बसले होते. सुदैवाने काही विपरित घडले नाही.