मुंबई : प्रतिनिधी
नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत शरद पवारांचे काहीही सांगता येत नाही. ते काहीही करू शकतात. काय ते आम्हालाही सांगता येणार नाही. कारण जे अजित पवारांना कळत नाही ते आम्हाला कसे कळणार, असे वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेसाठी तीन पक्ष एकत्र येणार असले तरी शिवसेनेला पाठिंबा देणारे कडू यांनी शरद पवारांबाबत एक प्रकारे अविश्वास व्यक्त केला आहे.
सध्याच्या घडामोडींबद्दल एका वृत्तवाहिनीशी बोलताना कडू यांनी दिलखुलास मते मांडली. सत्तास्थापनेचे चित्र जवळपास स्पष्ट आहे. फक्त बर्याच लोकांच्या डोक्यांवर शरद पवारांची भीती आहे. जोपर्यंत शपथविधी होत नाही, तोपर्यंत आमच्याही डोक्यात भीती आहे. पवार काय करतीय हे अजितदादांना समजले नाही. मला तर दूरची गोष्ट आहे, अशा शब्दांत कडू यांनी शरद पवारांच्या राजकारणाबद्दल साशंकता व्यक्त केली.
सुरुवातीला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची मानसिकता नव्हती, असे बच्चू कडू यांनी या वेळी सांगितले. ते म्हणाले की, सुरुवातीला हेच गृहीत धरले होते की, शिवसेना-भाजपची सत्ता येईल. त्या दृष्टीने पाठिंबा दिला होता. कालांतराने राजकारण बदलले. त्यामुळे हा बदल स्वीकारावा लागला.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी मला संपर्क केला होता. माझे मुख्यमंत्र्यांसोबत चांगले संबंध आहेत, पण मी उद्धव ठाकरे यांना शब्द दिलेला होता. त्यामुळे मी भाजपचा प्रस्ताव नाकारला, असा दावा कडू यांनी केला. शेवटी हे राजकारण आहे. स्वत:चा पक्ष मजबूत करण्याचा काम प्रत्येक जण करणारच, असेही ते म्हणाले.