Breaking News

कळंबोली-कामोठे जोडरस्त्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

कळंबोली : प्रतिनिधी

कामोठे-कळंबोली जोडरस्त्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 22) भूमिपूजन करण्यात आले. कामोठे, तसेच सायन-पनवेल महामार्गावरून कळंबोलीत जाण्याकरिता दोन किलोमीटर वळसा घालावा लागतो. त्यात वेळ व पैसा वाया जातोे. कळंबोली व कामोठ्यामधील सर्वसामान्य जनतेला होणार्‍या या त्रासाचा गांभीर्याने विचार करून आमदार ठाकूर यांनी या जोड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला.

भूमिपूजन कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक संतोष भोईर, अमर पाटील, राजेंद्र शर्मा, नगरसेविका प्रमिला पाटील, भाजपचे शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, पनवेल तालुका उपाध्यक्ष अशोक मोटे, कमळ कोठरी, बबन बारगजे, नितीन काळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

कळंबोलीकडून उलट मार्गाने रस्ता ओलांडताना छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यात काहींना जीवही गमावण्याची वेळ आली आहे. हे अपघात थांबून प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवाज उठविला होता. याबाबत स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्ष विजया कदम यांनीही पाठपुरावा केला आहे.

आमदार प्रशांत ठाकूर सिडकोच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याने कामांना गती येऊन शुक्रवारी या जोडरस्त्याचे भूमिपूजन त्यांच्याच हस्ते करण्यात आले. या जोडरस्त्यामुळे कळंबोली परिसर हा महामार्गाला सरळ जोडला जाऊन या रस्त्यावरून कळंबोली येथून मानसरोवर स्टेशन कडे ये-जा करण्यास लोकांना चांगली सोय होणार आहे. त्याचप्रमाणे कामोठ्यातून कळंबोलीकडे जाणार्‍या लोकांनाही फायदा होणार आहे. त्यामुळे कळंबोली-कामोठ्यातील जनतेत आनंदाचे वातावरण पसरले असून, आमदार प्रशांत ठाकूर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व आभार व्यक्त केले जात आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply