Breaking News

जेएनपीटी पर्यटकांसाठी उभारणार मॅनग्रोव्ह इको पार्क

उरण : प्रतिनिधी

जेएनपीटीने मॅनग्रोव्ह इको पार्क विकसित करण्याची तयारी सुरू केली आहे. जेएनपीटीच्या बेलपाडा येथील मालकीच्या जागेत पाच कोटी खर्चाचा हा प्रकल्प दोन टप्प्यांत उभारण्यात येणार आहे. पर्यावरण-पर्यटन वाढविण्यासाठी आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी पर्यटक आधारित उभारण्यात येणार्‍या इको टुरिझम प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार तयार करण्यात आला आहे.

जेएनपीटी राज्यातील वन विभागाच्या मॅनग्रोव्ह सेलच्या मदतीने इको पार्क विकसित करीत आहे. या प्रकल्पामध्ये इंटरप्रिटेशन सेंटर, पक्षी निरीक्षणासाठी वॉच टॉवर, पार्किंग, गार्डन, पर्यटकांसाठी रेस्टॉरंट, ब्लॉक टॉयलेट्स आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे जैवविविधतेवरील पर्यावरण-पर्यटन आणि शैक्षणिक क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार असून, येत्या तीन वर्षांत नियोजित प्रकल्प पूर्णत्वास जाऊन पर्यटकांसाठी खुला होईल, असा विश्वास जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी व्यक्त केला आहे.

या प्रकल्पात पार्कसोबतच परिसरात वन्यजीवांच्या संवर्धन व संरक्षणासाठी आवश्यक प्रशिक्षण, माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. जेएनपीटीचे उद्दीष्ट फक्त आर्थिक सामर्थ्य प्राप्त करणे नाही, तर पर्यावरणीय आणि सामाजिक स्थिरतेवरदेखील लक्ष केंद्रित करणे आहे. अशा प्रकारे पर्यावरण संरक्षण जेएनपीटीच्या नियोजन आणि प्रचालनाचा अविभाज्य भाग राहील, असेही सेठी यांनी म्हटले आहे.

जेएनपीटीने पर्यावरण संवर्धन व ग्रीन पोर्टसाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. यामध्ये चार एमएलडीचा मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प, बंदर प्रचालन क्षेत्रात ये-जा करण्यासाठी इलेक्ट्रिक कार्ट, टग्स व पोर्ट क्राफ्टसाठी शोर पॉवर सप्लाय, घाटावर ई-टॉयलेट्स सुरू करण्यात आले आहेत. जेएनपोर्टने सार्वजनिक इमारतींच्या छतांवर सुमारे 822 किलोवॅट क्षमतेचे सौर पॅनेल देखील स्थापित केले आहेत. ज्यामधून दरमहा सुमारे 80 हजार युनिट्सची विद्युत निर्मिती होते.

त्याचबरोबर उर्जेचा वापर कमी करण्यासाठी आणि कार्बनचे उत्सर्जन  कमी करण्यासाठी बंदर क्षेत्रात एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त पर्यावरणाच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण भूमिकाही बजावत आहे.पर्यावरणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी जेएनपीटी नियमितपणे चर्चासत्र आणि ज्ञान सत्रांचे आयोजन करत असते. ज्यामध्ये  बंदरांच्या गुणवत्तेची आणि आरोग्याच्या विविध बाबींविषयी माहिती दिली जाते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply