Breaking News

वाटेवरचे काटे

लोकांची कामे करताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे हात-पाय लकवा मारल्यागत थंड पडत असत. परंतु देवेंदजींनी ते चित्र पालटून महाराष्ट्राचा कारभार रूळावर आणला. नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार्‍या काळात ओल्या दुष्काळाला कसे तोंड देणार, नाणारच्या बहुचर्चित प्रकल्पाचे काय करणार, आरे वनातील मेट्रोप्रकल्पाच्या कामाचा बट्याबोळ होणार का, बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्राचे योगदान देणार का या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे उद्धव ठाकरे यांना द्यावी लागणार आहेत.

नवे वर्ष अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेले असताना महाराष्ट्रात एक आगळे सरकार स्थानापन्न होते आहे. दिवस सरता सरता शपथ घेते झालेले हे नवे सरकारही अखेर काळोखातच जन्माला आले असे म्हणावे लागेल. राज्यासमोर प्रचंड मोठ्या समस्या आ वासून उभ्या असताना कमालीच्या कसरतीनंतर स्थापन झालेले हे सरकार या गुंतागुंतीच्या समस्यांची उकल कशी करणार ही शंकाच आहे. तीन दिशांना तीन चाके असलेल्या या दिशाहीन कडबोळे सरकारचा टिकाव लागणे कठीण आहे अशी भविष्यवाणी मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाता-जाता वर्तवली होती, ती खरी न ठरो अशी प्रार्थनाही अनेकांकडून केली जात असेल. कारण हे सरकार पडले तर महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. आणि ते या राज्याला खचितच परवडणारे नाही. नव्या सरकारला देवेंद्र फडणवीस यांनी देखील शुभेच्छा दिल्याच आहेच, तशाच आपणही देऊ. तथापि प्रशासकीय अनुभवाचा गंधही नसलेल्या नवखे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धडपडाट करून खुर्ची तर पटकावली आहे, पण त्यांच्या पुढील मार्ग सोपा नाही हे निश्चित. अनेक गंभीर समस्यांचा निपटारा करण्यासाठी मुख्यमंत्र्याला अठरा-वीस तास राबावे लागते. शेकडो महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. एक प्रकारे ते महाराष्ट्राच्या कारभाराला संपूर्णपणे उत्तरदायी असतात. यासाठी लागणारी जबरदस्त क्षमता देवेंद्र फडणवीस यांनी समर्थपणे सिद्ध करून दाखवली होती. एकही दिवस सुटी न घेता पंतप्रधान मोदीजींप्रमाणेच देवेंद्रजींनी देखील पाच वर्षे जिवाचे रान करत महाराष्ट्राला प्रगतीपथावर दौडविले. अशा क्षमतेचे नेते दुर्मिळच असतात. नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी तडफ दाखवतात का हे आता येणारा काळच ठरवेल. देवेंद्रजींनी कारभाराची सूत्रे हाती घेतली, त्याआधी अकरा वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा फटका मराठी जनतेने सहन केला होता. शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे वचन ज्यांनी दिले होते ते आता वडिलांना दिलेल्या वचनाप्रमाणेच याही वचनाला जागतात का हे पहावे लागेल. उद्धव ठाकरे यांना तर कडबोळ्यातील अन्य दोन पक्षांना साथीला घेऊन काम करायचे आहे. शपथविधी आधीच सत्तावाटपाचा इतका घोळ घालणारे हे तिन्ही सत्ताधारी पक्ष गुण्यागोविंदाने कारभार कसा करणार हा सर्वात मोठा अवघड प्रश्न आहे.  त्यात आता उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पक्षासारख्या जबरदस्त गोलंदाजाच्या तेज मार्‍यासमोर टिकून राहण्याची धडपड करावी लागेल. हे वास्तव माहित असल्यामुळेच मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या सरकारला शुभेच्छा देताना ती भविष्यवाणी उच्चारली होती. खरे तर उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा ही अग्निपरीक्षा महाराष्ट्राच्या जनतेचीच आहे असे म्हणावे लागेल.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply