Breaking News

युद्ध आमुचे सुरू

लोकांना घरातच बसवण्याची सक्ती काहीशी गैरसोयीची नक्कीच आहे. परंतु ही युद्धसदृश परिस्थिती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. युद्ध काळात जसे कडक निर्बंध लादले जातात. तशाच प्रकारच्या गांभीर्याने विषाणूविरुद्धच्या लढाईत देखील दोन हात करावे लागतील.

सारा देश कोरोना विषाणूशी भीषण झुंज देत आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आपल्या महाराष्ट्रातच आहेत हा दुर्दैवाचा भाग. पुढील दहा दिवस या युद्धामध्ये निर्णायक ठरणार आहेत. तेव्हा प्रत्येकाने एक सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखायला हवी आणि आटोकाट काळजी घ्यायला हवी. कोरोना विषाणूशी सुरू असलेल्या लढाईत जिंकण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून प्रत्येक नागरिकाने देखील या संघर्षातला आपला वाटा उचलला पाहिजे. महाराष्ट्रातील बहुसंख्य शहरी भागात गर्दी बर्‍यापैकी ओसरलेली दिसते. महानगरी मुंबईत देखील गर्दी अंशत: कमी झाली असली तरी अजूनही अनेक लोक सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा उपयोग करताना दिसतात. गर्दी टाळणे हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय सध्या तरी आपल्या हाती आहे. लोकांनी स्वयंनिग्रहाने आपल्या हालचाली आणि कामकाजावर बंधने घालून घेतली नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, दूधकेंद्रे आदी आवश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प होणे गरजेचे आहे. राज्य सरकारच्या आवाहनानुसार बहुतेक ठिकाणी व्यापार्‍यांनी बाजारपेठा बंद ठेवून या युद्धातील आपला वाटा उचलला आहे. पनवेलमधील महापालिका प्रशासन आणि व्यापार्‍यांनीही पुढाकार घेऊन किराणा सामान व औषधांची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थातच त्यांचा हा निर्णय अतिशय योग्य असाच आहे. मुंबईमधील दादर आणि क्रॉफर्ड मार्केटसारखी मोक्याची बाजाराची ठिकाणे गुरुवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात यश आले. असे असले तरी मुंबईत अजूनही थोडीफार गर्दी दिसतेच. लोकांनी स्वत:वर निर्बंध घालून घेतले नाहीत तर सक्तीने संपूर्ण ‘लॉकडाऊन’ करावे लागेल यात शंका नाही. ती वेळ नागरिक आपल्यावर येऊ देणार नाहीत अशी अपेक्षा आहे. खाजगी क्षेत्रातील कंपन्या व कचेर्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ धोरण राबवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच सरकारी कार्यालयांमध्ये निम्म्या म्हणजे 50 टक्के उपस्थितीच्या जोरावर कारभार चालवण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. आयसीएसई आणि सीबीएसई या केंद्रीय मंडळांनी आपल्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे उर्वरित पेपर लांबणीवर टाकून ‘आरोग्यच सर्वाधिक महत्त्वाचे’ हे अधोरेखित केले आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकांचा एकमेकांशी कमीत कमी संपर्क यावा यासाठी ही काळजी घेणे गरजेचे बनले आहे. कोरोना विषाणूच्या फैलावाचा उगम चीनमधील ज्या हुबेई प्रांतात झाला त्याठिकाणी गेल्या तीन दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. हे शक्य झाले कारण चीनी सरकारने त्या परिसरामध्ये अत्यंत कडक निर्बंध लादले होते. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संपूर्ण देशातील आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस राबवून कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडी सांभाळली आहे. त्यांच्याच सूचनांनुसार राज्या-राज्यातील आरोग्ययंत्रणा काम करीत आहेत. ‘माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू’ ही कवितेची ओळ एक मार्गदर्शक तत्त्व बनून गेली आहे.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply