
कर्जत : बातमीदार
कृषी पर्यटनाची सुरुवात भारतात सर्वात आधी सुरू करून कृषी पर्यटन संकल्पना जन्माला घातल्याबद्दल आणि कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून राज्यातील शेतकर्यांना आर्थिक स्रोत निर्माण करून दिल्याबद्दल नेरळ येथील शेखर भडसावळे यांना कृषी पर्यटनाचे जनक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कृषी आणि ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ (मार्ट) या संस्थेच्या वतीने नेरळमधील सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्रात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी भडसावळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब बरहाटे, सचिव विजय झोळ यांच्यासह पुणे, सातारा, रायगड, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्र चालविणारे शेतकरी उपस्थित होते. या वेळी चंदन भडसावळे, आनंद जाधव, विसपुते यांनी आपल्या कृषी पर्यटन केंद्राची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली जाधव यांनी केले.