Breaking News

अखेर सचिन वाझेंची उचलबांगडी; मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात ठाकरे सरकार बॅकफूटवर

मुंबई ः प्रतिनिधी

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा मुद्दा विरोधी पक्ष भाजपने अधिवेशनात आक्रमकपणे लावून धरल्यानंतर ठाकरे सरकार बॅकफूटवर आले आहे. या मृत्यू प्रकरणात संशयाची सुई असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अखेर गुन्हे शाखेतून बदली करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी  (दि. 10) विधान परिषदेत केली, पण वाझे यांची केवळ बदली करून चालणार नाही, तर त्यांना अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भाजप सदस्यांनी सभागृहात केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवदेनाच्या सुरुवातीला राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी दिली. या वेळी विरोधकांनी सचिन वाझेंवर सरकार काय कारवाई करणार आहे अशी विचारणा करीत त्यावर बोलण्याची मागणी केली. देशमुख यांनी सांगितले की, सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. त्यांना क्राइम ब्रांच येथून हलवून त्यांची दुसर्‍या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल तसेच चौकशी केली जाईल. यावर वाझेंची बदली नाही, तर त्यांचे निलंबन करून त्यांना अटक करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. सचिन वाझे प्रकरणावरुन वातावरण अत्यंत संतप्त आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंनी पतीचा खून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. प्रथमदर्शनी अनेक पुरावे समोर येत आहेत. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांच्या पत्नीचा जबाब सांगितला. तरीही सरकार सचिन वाझेंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप दरेकर यांनी केला. पूजा चव्हाण प्रकरणात 20 दिवस एफआयआर दाखल झाला नाही. लॅपटॉपवरील पुरावे गायब झाले, अरुण राठोड गायब आहे, रुग्णालयात गर्भपात करणारी पूजा अरुण राठोड कोण हे अजून समोर आलेले नाही, असा उल्लेख करीत दरेकर यांनी कायदा-सुव्यस्थेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply