रहिवासी भागात आढळलेल्या सापांना मिळाला हक्काचा अधिवास

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील जनमानसात सर्प आणि प्राणीप्रेमींची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. खेडोपाडी, दुर्गम वाडी वस्त्यांतच नव्हे, तर हाऊसिंग सोसायट्या आणि नागरी वस्तीत साप आढळून आला की त्याची माहिती तातडीने सर्पमित्रांना दिली जाते. सर्पमित्र मिळालेल्या जुजबी माहितीनुसार आणि वनाधिकार्यांनी निर्देशित केलेल्या निकषाप्रमाणे साप पकडतात. पकडलेल्या सापाची तपशीलवार माहिती ठेवली जाते आणि वनाधिकार्यांना कळवून किंवा त्यांच्या उपस्थितीत सापाला सुरक्षित वनक्षेत्रांत सोडण्याची प्रक्रिया पूर्ण करतात.
शुक्रवारी (दि. 29) खालापूरचे वनाधिकारी आशिष पाटील, श्री. ढाकोळ आणि वन कर्मचार्यांच्या सोबत नवीन मोरे, प्रदीप कुळकर्णी, अशोक मिस्त्री, धर्मेद्र रावळ, गुरुनाथ साठेलकर, पंकज मोरे, अमोल कदम, मेहबूब जमादार यांनी धामण, तस्कर, डुरक्या घोणस, दुर्मिळ असा कृष्णशीर्ष, गवत्या इत्यादी जातीच्या सापांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधीवासात मुक्त केले.
सापांना नैसर्गिक वातावरणात मुक्त करण्यासाठी जंगलभ्रमंतीचे आयोजन केले होते. त्यासाठी सह्याद्रीच्या पर्वत रांगातील बोरघाटातला अत्यतं दुर्गम भाग निवडला गेला होता. मानवी वस्तीपासून खूप दूर पायपीट करून त्या सापांना अनुकूल असे वातावरण मिळेल याचे सर्व्हेक्षण केले होते. साप हा नैसर्गिक अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा दुवा असून त्याचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करीत आशीष पाटील यांनी सर्व सर्पमित्रांचे कौतुक केले. त्यांनी सर्पमित्रांना काही महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केले.
या जंगल भ्रमंतीच्या मोहिमेदरम्यान औषधी वनस्पती, फुलझाडे, फुलपाखरे, पक्षी आणि माकडांच्या विविध जातींच्या बद्दल आशीष पाटील यांनी माहिती दिली. जनसामान्यांच्या मनातली सापांबद्दलची भीती कमी व्हावी, यासाठी प्रबोधन शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना करत असताना त्यांनी सर्पमित्रांना जीवाचीही काळजी घेण्यास सांगितले. सर्पतज्ज्ञ प्रदीप कुलकर्णी लिखित साप आपला मित्र हे पुस्तक या वेळी सर्वांना भेट देण्यात आले.