राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावला 500 कोटींचा दंड
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : जर्मनची कार उत्पादक कंपनी फॉक्सवॅगनला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) कंपनीला 500 कोटींचा दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम येत्या दोन महिन्यांत भरण्याची ताकीद एनजीटीने फॉक्सवॅगनला दिली आहे. आपल्या कारमध्ये बेकायदारित्या चीप सेट लावल्याप्रकरणी एनजीटीने कंपनीला दंड केला आहे. या उपकरणामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्याऐवजी त्याच्या आकडेवारीत बदल केला जात होता.तत्पूर्वी एनजीटीने जानेवारीतही फॉक्सवॅगनला 100 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते, पण त्यावर कंपनीने कोणतेच पाऊल उचलले नव्हते. फॉक्सवॅगनच्या कारमधून वायू प्रदूषण वाढत असल्याच्या कारणावरून एनजीटीने हा निर्णय घेतला आहे. फॉक्सवॅगन कंपनीने आपल्या डिझेल कारमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्याऐवजी प्रदूषण तपासणीच्या आकड्यांमध्ये फेरफार होईल, अशा चीपचा वापर केल्याचा आरोप आहे. कंपनीने 2008-15 दरम्यान 1.11 कोटी कारमध्ये हे उपकरण लावल्याचे वर्ष 2015मध्ये पहिल्यांदा मान्य केले होते. या उपकरणाच्या मदतीने कारमधून होणार्या कार्बन उत्सर्जनाच्या आकड्यात फेरफार करता येऊ शकते हे प्रयोगशाळेत स्पष्ट झाले. या घोटाळ्यानंतर कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. जर्मनीमध्ये या कंपनीला 8,300 कोटींचा दंड करण्यात आला आहे.