Breaking News

मोबाईल फोन हिसकावणार्या लुटारूंचा सुळसुळाट

पनवेल ः वार्ताहर

रेल्वे प्रवाशांच्या हातातील मोबाईल फोन हिसकावणार्‍या लुटारुंनी पनवेल आणि खांदेश्वर रेल्वे स्थानकावर दोन प्रवाशाचे महागडे फोन हिसकावून पलायन केल्याची घटना घडली.

पनवेल रेल्वे पोलिसांनी या दोन्ही घटनेतील लुटारुंवर जबरी चोरीचे गुन्हे दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. पनवेल रेल्वे स्थानकात घडलेल्या पहिल्या घटनेत नवीन पनवेल भागात राहणारे रविंद्रकुमार जाधव हे कामावर जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकात आले होते. यावेळी ते पनवेल-सीएसटी लोकलमध्ये बसले असताना, त्यांना फोन आल्याने त्यांनी आपल्या खिशातून मोबाईल काढला. याचवेळी त्यांच्या समोर बसलेल्या लुटारुने रविंद्रकुमार यांच्या हातातील 18 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन खेचला. त्यानंतर सदर लुटारुने लोकलमधून रेल्वे रुळावर उडी टाकून पलायन केले. या घटनेनंतर रविंद्रकुमारने पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या घटनेनंतर खांदेश्वर रेल्वे स्थानकावर दुसरी घटना घडली. कामोठे भागात रहाणारी इश्मीता छाबडा (26) ही तरुणी ऐरोली येथे जाण्यासाठी खांदेश्वर रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी इश्मीता रेल्वे स्थानकावरील बाकड्यावर बसून मोबाईल फोन बघत ठाणे लोकलची वाट पहात बसली होती. याचवेळी रेल्वेच्या रुळातून आलेल्या अज्ञात चोरट्याने इश्मीताच्या हातातील 34 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन हिसकावून रेल्वे रुळावर उडी टाकून अंधारात पलायन केले.

======================

घरफोडी करून दागिन्यांची चोरी

पनवेल ः वार्ताहर

एका बंद घरामधील बेडरुममध्येे ठेवलेले दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना तालुक्यातील रोडपाली येथे घडली आहे.

प्रमिला म्हात्रे यांच्या घरातील बेडरुममधील कपाटात ठेवलेले जवळपास 3 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घरात कोणी नसताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून दागिने व रोख रक्कम चोरुन नेली आहे.

================

रोडपाली येथून सात बांगलादेशी नागरिकांना अटक

पनवेल ः वार्ताहर

कळंबोलीतील रोडपाली भागात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या 7 बांगलादेशी नागरिकांना कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. यात तीन महिलांचा सामावेश असून हे सर्व बांगलादेशी नागरिक कळंबोली व आजुबाजुच्या परिसरात बांधकाम साईटवर बिगारी व घरकाम करुन रहात असल्याचे तपासात आढळुन आले आहे. 

कळंबोलीतील रोडपाली भागात काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असल्याची माहिती कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार कळंबोली पोलिसांच्या पथकाने घुसखोर बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेला सुरुवात केली होती. त्यानंतर रोडपाली गावातील अन्नपुर्णा निवास या घरावर छापा मारला. यावेळी सदर घरामध्ये रहाणार्‍या आलमगिर अब्दुलसत्तार शेख (45), मिराज आलमगिर शेख (21), सिराज आलमगिर शेख (20), निमा सिराज शेख (17) आणि रियाज आलमगिर शेख (16) हे पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी रोडपालीतील किसन निवास या घरावर छापा मारला असता, सदर घरामध्ये रिना मोहम्मद शकील शद्दल (23) हि महिला आपल्या 4 वर्षीय मुलीसोबत रहात असल्याचे आढळुन आले.  त्यानंतर पोलिसांनी तीला ताब्यात घेऊन रोडपाली गावातील घर नंबर-92 वर छापा मारला. त्याठिकाणी देखील सलमा बेगम युनुस काजी (40) हि बांगलादेशी महिला आढळुन आली. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे त्यांच्या नागरिकत्वाबाबत चौकशी केली.

तसेच नागरिकत्वाबाबतची कागदपत्रे अथवा इतर काही पुरावे सादर करण्यास सांगितले. मात्र त्यापैकी कुणीही पुरावे सादर केले नाहीत. त्यांच्या चौकशीअंती त्यांनी बांगलादेशी नागरिक असल्याचे तसेच त्यांनी बांगलादेशातील उपासमारीला कंटाळून बेकायदेशीरीत्या घुसखोरी करुन भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यानुसार कळंबोली पोलिसांनी सर्व बांगलादेशी नागरिकांवर विदेशी व्यक्ती अधिनियम त्याचप्रमाणे पारपत्र अधिनियम 1920 नुसार गुन्हा दाखल करुन सगळ्यांना अटक केली.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply