Sunday , October 1 2023
Breaking News

गब्बर इज बॅक!

कोलकाता : वृत्तसंस्था

आयपीएलमध्ये शुक्रवारी (दि. 12) दिल्लीने कोलकातावर सात गडी राखून मोठा विजय मिळवला. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद 97 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने 179 धावांचे आव्हान 7 चेंडू राखून पूर्ण केले. कोलकाताने प्रथम फलंदाजी करीत 20 षटकात 7 बाद 178 धावा केल्या होत्या, मात्र त्यांच्या गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही.

या सामन्यात शिखर धवनने झंझावाती खेळी केली. त्याने एक बाजू लावून धरली. सुरुवातीला पृथ्वी शॉ आणि त्यानंतर ऋषभ पंतच्या साथीने त्याने धमाकेदार खेळी केली. धवनला आपल्या ट्वेन्टी-20 कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक झळकावण्याची संधी होती, मात्र कॉलिन इन्ग्रॅमने (14*) फलंदाजाने विजयी षटकार लगावल्याने त्याला 97 धावांवर नाबाद राहावे लागले. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 2 षटकार खेचले.

दरम्यान, 179 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वी शॉ झेलबाद झाला आणि दिल्लीला पहिला धक्का बसला. पृथ्वीने 14 धावा केल्या. त्यात दोन उत्तुंग षटकारांचा समावेश होता. कर्णधार श्रेयस अय्यरने चाहत्यांचा अपेक्षाभंग केला. केवळ 6 धावा करून तो माघारी परतला आणि दिल्लीला दुसरा धक्का बसला. धवनच्या साथीने खेळत पंतने दमदार फटकेबाजी केली, पण अर्धशतकाने त्याला हुलकावणी दिली. तो 46 धावा करून बाद झाला. त्यानंतर धवन आणि इन्ग्रॅम यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

त्याआधी कोलकाताकडून सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळालेला जो डेण्टली पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. इशांत शर्माने उत्कृष्ट स्विंग गोलंदाजी करीत त्याला माघारी धाडले. किमो पॉल याच्या गोलंदाजीवर मिळालेल्या ‘फ्री हिट’वर षटकार लगावत कोलकाताने अर्धशतकी मजल मारली. रॉबिन उथप्पाने अचूक फटका खेळत ‘फ्री हिट’चा उपयोग केला. धडाकेबाज सुरुवात मिळालेला उथप्पा उसळत्या चेंडूवर फटका लगावताना झेलबाद झाला. यष्टिरक्षकाने उंच उडी मारून त्याचा अप्रतिम झेल टिपला. उथप्पाने चार चौकार आणि एक षटकार लगावत 30 चेंडूंत 28 धावा केल्या. शुभमन गिल याने अप्रतिम खेळी साकारत दमदार अर्धशतक झळकावले, पण कोलकाताच्या संघाला तो आनंद फार काळ साजरा करता आला नाही. कारण त्यानंतरच्या षटकातच नितीश राणा त्रिफळाचीत झाला आणि कोलकाताचा तिसरा गडी माघारी परतला. राणाने 12 चेंडूंत 11 धावा केल्या. अर्धशतक पूर्ण केल्यावर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात गिल झेलबाद झाला. त्याने 39 चेंडूंत दमदार 65 धावा केल्या. यात सात चौकार आणि दोन षटकार समाविष्ट होते. कर्णधार दिनेश कार्तिक 2 धावांवर बाद झाला. आंद्रे रसलने नेहमीप्रमाणे फटकेबाजी करीत 45 धावा केल्या. यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकार खेचले. क्रेग ब्रेथवेट 6 धावांवर बाद झाला. शेवटच्या टप्प्यात पियुष चावलाच्या 6 चेंडूंत 14 धावांच्या जोरावर कोलकाताने 178 धावांपर्यंत मजल मारली.

Check Also

शूटिंगबॉल स्पर्धेत रामशेठ ठाकूर स्कूलचे यश

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक …

Leave a Reply