Breaking News

महिला वेषधारी लुटारू पुरुषाला अटक

कर्जत : बातमीदार

महिलेचा वेष परिधान करून प्रवाशांना लुटणार्‍या पुरुष लुटारूला कर्जत रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे लोकलमध्ये महिलांच्या डब्यात घडलेल्या लुटीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची चिन्हे आहेत.

कर्जत लोकलमध्ये वांगणी ते भिवपुरी रेल्वेस्थानकांदरम्यान एक पुरुष हा महिलेसारखी वेषभूषा करून महिला प्रवाशांना लुटत असे. याबाबतची तक्रार कर्जत स्थानकात असलेल्या रेल्वे पोलिसांकडे दाखल झाली होती. या गुन्ह्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डुंबरे, फौजदार आर. पी. जाधव, शिपाई पठाण, नाईक यांनी खबर्‍यांचा आधार घेऊन तपास केला आणि लकी साबुलाल गौतम (वय 24) याला नेरळ रेल्वेस्थानक परिसरातून ताब्यात घेतले.

महिलांचे कपडे परिधान करून लूट करणारा हा पुरुष लुटारू दादर पश्चिम येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. हा तरुण उपनगरीय लोकलमध्ये महिलांना लक्ष्य करून त्यांच्याजवळील पैसे जबरीने काढून घेत असे. तो प्रसंगी दमदाटीही करायचा. त्याच्यावर कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 392 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. अशा आरोपींवर कडक कायदेशीर करावी, अशी मागणी पॅसेंजर असोसिएशनने केली आहे.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply