Monday , January 30 2023
Breaking News

भिवपुरी रोड स्टेशनमधील पादचारी पूल खुला न केल्याने प्रवाशांचा रूळावरून प्रवास

कर्जत : बातमीदार

भिवपुरी रोड या रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेने उभारलेल्या पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे, मात्र तो पूल प्रवाशांसाठी खुला केला नसल्याने प्रवासी रेल्वेमार्ग ओलांडून जात असून ते धोकादायक बनले आहे. त्यामुळे हा पादचारी पूल तत्काळ खुला करावा आणि येथील रेल्वेमार्गाच्या बाजूने कठडे उभे करावेत, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात रेल्वेमार्ग ओलांडून प्रवासी आपल्या गावी जात असतात. रूळ ओलांडत असताना अनेकांचे अपघात झाले असून, त्यात स्थानिक आणि अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे या भागातील प्रवाशांनी पादचारी पुलाची मागणी करण्यासाठी सह्यांची मोहीम राबवून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या महाव्यवस्थापकांना निवेदन दिले होते. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने 2018मध्ये भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात कर्जत दिशेकडे पादचारी पूल मंजूर केला. हा पादचारी पूल तयार होऊन किमान चार महिने झाले असून, तो पूल मध्य रेल्वेकडून पादचार्‍यांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे आजपर्यंत प्रवासी हे रेल्वेमार्ग ओलांडून जात आहेत. भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातील फलाट एकच्या बाहेर चिंचवली, उकरूळ, एकसळ, बार्डी आदी गावे असून, पादचारी पूल नसल्याने ते सर्व प्रवासी रूळ ओलांडून जात असतात. फलाट क्रमांक दोनच्या बाहेर डिकसळ, गारपोली, उमरोली, आषाणे, कोषाणे, वडवली, आसल या भागातील रहिवासी लोकलने आल्यानंतर रूळ ओलांडून जात असतात. त्यात भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात असलेल्या सायडिंग रेल्वेमार्गावर नेहमी मालगाडी उभी असते. त्या मालगाडीच्या खालून हे प्रवासी रेल्वेमार्ग ओलांडत असतात.

भिवपुरी रोड स्थानकात उभारण्यात आलेला पादचारी पूल मध्य रेल्वे प्रशासनाने खुला करण्याची गरज आहे. हा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला केल्यावर रेल्वेमार्गांच्या दोन्ही बाजूला लोखंडी जाळ्या किंवा संरक्षक भिंत बांधून घ्यावी, जेणेकरून कोणीही त्या ठिकाणी रूळ ओलांडून जाणार नाही.

-किशोर गायकवाड, अध्यक्ष, प्रवासी संघटना

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply