Monday , January 30 2023
Breaking News

दिल्लीत अग्नितांडव, अनाज मंडी परिसरात 43 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राजधानी दिल्लीत अनाज मंडीत परिसरातील कारखान्यामध्ये लागलेल्या भीषण आगीत होरपळून 43 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 8) पहाटे घडली. या आगीत अनेक जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनाज मंडीतील एका इमारतीमध्ये असलेल्या फॅक्टरीला पहाटे 5.20च्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे वृत्त कळाल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि जवानांनी  युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतले. आगीतून अनेकांना वाचविण्यात आले, मात्र 43 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार फॅक्टरीमध्ये कामगार गाढ झोपले असताना आगीचे तांडव झाले. अनेकांचा आगीच्या धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यू झालेले कामगार बिहार आणि उत्तर प्रदेशमधील आहेत. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदींनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. दरम्यान, आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, तर जखमींना एक लाख आर्थिक मदतीची घोषणा सरकारने केली आहे. पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतूनही मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये, तर गंभीर जखमींसाठी 50 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

बचावकार्यात अडथळे

ज्या परिसरात आग लागली तेथील गल्लीबोळ फारच अरुंद आहेत, तसेच या परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी साधन उपलब्ध नसल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी दूरवरून पाणी आणावे लागले. या दुर्घटनेची तीव्रता वाढण्यास घरांमध्ये असणारे छोटे-छोटे कारखाने आणि चुकीची माहितीही कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्लीतील राणी झांसी रोडवरील धान्य बाजारातील दुर्घटना अत्यंत भयंकर आहे. या आगीत ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो, तसेच जखमी लोक लवकर बरे व्हावेत असे चिंततो.

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply