अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात जय हनुमान क्रीडा मंडळ चरी या संघाने विजेतेपद पटाकवले. म्हसोबा क्रीडा मंडळ पेझारी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांमध्ये केएस क्लब अजिंक्य ठरला. राजमाता स्पोर्टस क्लब कळंबोली संघ उपविजेता ठरला.
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशच्या विद्यमाने गणेश मत्रिमंडळ व भालचंद्र स्पोर्टस क्लब बोकडविरा यांच्या संयोजनाखाली उरण तालुक्यतील बोकडविरा येथे ही स्पर्धा अयोजित करण्यात आली होती
पुरूष गटात जय हनुमान चरी व म्हसोबा पेझारी यांच्यात झालेला अंतिम सामना अटीतटीचा झाला. पूर्वार्धात म्हसोबा पेझारी संघाकडे 10-5 अशी आघाडी होती. परंतु उत्तरार्धात जय हनुमान चरी या संघाने आपला खेळ उंचावला. पूर्वार्धात 10 गुणांनी पिछाडीवर पडलेल्या जयहनुमान चरी संघाने ही पिछाडी भरून काढून सामना 20-18 असा जिंकून विजेतपद पटकावले. उपांत्य फेरीच्या लढतील जयहनुमान चरी संघाने गणेश क्लब बोकडविरा संघांचा
30-6 असा सहज पराभव केला. दुसर्या उपांत्य लढतीत म्हसोबा पेझारी संघाने पांडवादेवी रायवाडी संघावर 26 – 17 अशी मात केली. महिलांचा अंतिम सामना देखील रंगतदार झाला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणार्या या सामन्यात केएस क्लबने कळंबोली येथील राजमाता स्पोर्टस क्लबचा 31-29 असा पराभव करून विजेतपद मिळवले. उपांत्य फेरीच्या लढतीत राजमता कळंबोली संघाने प्रतिज्ञा क्रीडा मंडळ बांधण या संघाचा 42-17 असा पराभ केला. दुसर्या उपांत्य सामन्यात केएस क्लबने मिदास स्पोर्टस उरण या संघाला 19-11 असे पराभूत केले. या स्पर्धेतून रायगड जिल्ह्याचे परुष व महिला संघ निवडण्यात आले आहेत. हे संघ राज्य अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धेत रायगडचे प्रतिनिधीत्व करतील. ही स्पर्धा 19 ते 22 डिसेंबर या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे खेळली जाणार आहे.