खोपोली : प्रतिनिधी
मुंबई – पूणे द्रूतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याच्या आतील क्राँकीट केलेला मोठा भाग सोमवारी (दि. 9) रात्री बाजूपट्टीवर कोसळला. सुदैवाने त्यावेळी कोणतेही वाहन तडाख्यात न सापडल्याने जिवित हानी टळली.
सोमवारी रात्री मुंबई मार्गिकेमध्ये आडोशी बोगद्याच्या आतील क्राँक्रीटचा थर दिलेला मोठा भाग कोसळला. मोठ मोठे तुकड मार्गिकेच्या बाजूपट्टीवर तसेच काही छोटे तुकडे मार्गिकेमध्ये पडले होते. बोगद्यात वाहनाची गती कमी असल्याने वाहन चालक सावधगिरी बाळगत होते. आडोशी बोगद्यात काही तरी पडले असल्याची माहिती अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पथक प्रमुख गुरूनाथ साठेलकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अधिकार्यांना माहिती दिली. त्यानंतर तातडीने बोगद्यातील काँक्रिटचे मोठे तुकङे बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
पावसाळ्यात आडोशी बोगद्याजवळ डोंगराचा काही भाग सैलसर झाला होता. त्या अनुषंगाने बोगद्याची अंतर्गत तपासणी तज्ञाकडून करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होवू नये यासाठी तांत्रीक बाबी तपासून घेणार असून, माडप बोगदाचीही तपासणी करण्यात येईल.
-ए. ई.सोनावणे, मुख्य कार्यकारी अभियंता
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पूणे
बोगद्याचा काही किरकोळ भाग कोसळला होता. त्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. मात्र समयसूचकता कामाला आली आणि पुढची हानी टळली. या घटनेची उच्च दखल घेऊन तो टप्पा दुरुस्तीचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले.
-गुरुनाथ साठेलकर,पथक प्रमुख,
अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी, खोपोली