तडाखेबंद खेळीने अनेक विक्रमांना गवसणी
मुंबई : प्रतिनिधी
वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका भारताने मोठ्या दिमाखात जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुलच्या स्फोटक फलंदाजीचा मोठा वाटा होता. विराटने आपल्या धमाकेदार खेळीत दोन विक्रम आपल्या नावे केले आहेत.
विराट कोहलीने तिसर्या विकेटसाठी के. एल. राहुलसोबत 50 चेंडूंत 95 धावांची भागीदारी रचली. विराटने अवघ्या 29 चेंडूंत 70 धावा फटकावल्या. आपल्या खेळीत त्याने सात षटकार आणि चार चौकार लगावले. आपल्या खेळीदरम्यान विराटने युवराज सिंगचा 12 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. विराट हा कोणत्याही एका टी-20 मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटने या मालिकेत एकूण 13 षटकार लगावले. युवराजने 2007च्या टी-20 विश्वचषकात पाच डावांत 12 षटकार लगावले होते.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या तिसर्या सामन्यात विराटने सात धावा पूर्ण करताच त्याने आणखी एक विक्रम केला. विराट घरगुती मैदानावर एक हजार धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय व जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी न्यूझीलंडच्या गप्टील आणि कोलिन मनरो यांनी एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत अव्वल स्थानी पोहचला आहे. रोहित शर्मा आणि विराट या दोघांच्याही टी-20 क्रिकेटमध्ये 2633 धावा आहेत.
यासोबतच विराटने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये मालिकावीर या नात्याने अनोखा षटकार मारला आहे. मालिकावीराचा किताब जिंकण्याची विराटची ही सहावी वेळ ठरली. या यादीत एकही खेळाडू सध्या विराटच्या जवळपास नाही.
टी-20 मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ आता वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. 15 तारखेला पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.