Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर पनवेलमध्ये प्रदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त
सेवा व समर्पण अभियानांतर्गत जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर पनवेलमध्ये प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 18) करण्यात आले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहे. त्या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्हा आणि पनवेल भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व व जीवनावर आधारित तीन दिवसीय प्रदर्शन ओरियन मॉलमध्ये भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, ज्येष्ठ नेते सुनील घरत, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रूचिता लोंढे, वृषाली वाघमारे, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, ओरियन मॉलचे संचालक मनन परुळेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, चिन्मय समेळ, प्रसाद हनुमंते आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन सदैव गरीब, वंचित, दलित, आदिवासी, मागास आणि शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. अनेक दशकानंतर समाजातील उपेक्षित घटकांचा आवाज मोदी सरकारकडून ऐकला जात असून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार सज्ज आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान म्हणून 7 ऑक्टोबर 2021ला जनतेच्या आशीर्वादाने जनसेवक म्हणून 20 वर्ष पूर्ण करीत आहेत.
लोकशाहीत लोकनेता ही संधी फार कमी नेत्यांना मिळत असून नरेंद्र मोदी यांची निरंतर वाढणारी लोकप्रियता दर्शवत आहे. या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनसेवक म्हणून 20 वर्षे कार्यकाळ पूर्ण झाल्याचा सुखद योगायोग व आनंदी क्षण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात सेवा व समर्पण अभियानांतर्गत दिव्यांगांना कृत्रिम अवयव, उपकरणे वाटप, आरोग्य तपासणी शिबिर, गरीब वस्ती, अनाथाश्रम, वृद्धाश्रम व रुग्णालयांना भेट देऊन फळे वाटप, प्लॅस्टिक निर्मूलन मोहीम, रक्तदान शिबिर, धान्यवाटप, कापडी पिशव्यांचे वाटप, नदी सफाई अभियान अशाच प्रकारे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.
पंतप्रधान देशाला आत्मनिर्भर बनवताहेत -आमदार प्रशांत ठाकूर
संपूर्ण जगात आपल्या भारत देशाचे नाव अभिमानाने उंचवण्याचे काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशात विविध योजना अमलात आणून देशाचा विकास करण्याचे काम ते करीत आहेत. जगात कोरोनाचे संकट आले. अनेक देश त्यात हतबल झाले, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ उपाययोजना करीत या संकटात देशासह जगाला आदर्श दिला. देशाला आत्मनिर्भर करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. 17 सप्टेंबरला अडीच कोटी नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करून विश्वविक्रम झाला आहे. अशा प्रकारे देशाच्या विकासाचे अनेक विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत राहतील. देशाच्या विकासाच्या अनुषंगाने नवभारताच्या निर्मितीत प्रत्येक नागरिकाने सहभाग घेतला पाहिजे, असे आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply