Breaking News

केंद्राच्या जीवावर मदतीची घोषणा केलेली का? फडणवीसांचा हल्लाबोल

नागपूर : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत सत्ताधार्‍यांचा सर्व गोष्टी केंद्राकडे टोलवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असून, सत्ताधार्‍यांनी केंद्राच्या जीवावर शेतकर्‍यांना मदतीची घोषणा केली होती का, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. विधानसभेच्या बाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात आमचे काळजीवाहू सरकार असताना आम्ही कॅबिनेटमध्ये 10 हजार कोटी रुपयांची मान्यता दिली होती. त्यानंतर आमचे सरकार नव्हते. त्यामुळे आम्ही जीआर काढू शकलो नाही, असे फडणवीस म्हणाले. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या मागणीचीही फडणवीस यांनी आठवण करून दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार 25 हजार रुपये हेक्टर या दराने 23 हजार कोटी रुपये कधी देणार, हे आम्ही त्यांना विचारले आहे. केंद्राकडे सर्व गोष्टी टोलवण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांनी करू नये. आम्हीही सत्तेत होतो. तेव्हा केंद्राने नियमानुसारच पैसे दिले आहेत, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलेे.

केंद्राकडून मिळणार्‍या मदतीचे नियम आणि निकष ठरलेले असतात हे माहीत असतानाही तुम्ही घोषणा करताना स्वत:च्या जीवावर केली होती का, याचेदेखील उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे, असे फडणवीस म्हणाले. सरकार स्थापन होऊनही अद्याप शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ठोस निर्णय झालेला नाही. तो तातडीने व्हावा, अशी भाजपची मागणी असल्याचेही फडणवीस म्हणाले.

आमच्यावर सत्ताधारी आमदारांनी हल्ला केला. आम्ही मूळचेच आक्रमक आहोत. आमच्या अंगावर आलात तर गप्प बसणार नाही. माझा बॅनर खेचण्याचा प्रयत्न केला. शेतकर्‍यांसाठी निलंबन झाले तरी चालेल.

-अभिमन्यू पवार, भाजप आमदार

शिवसेनेने म्हटले होते, आपला खरा कणा हा शेतकरी आहे. त्यांना मदत जाहीर झालीच पाहिजे. जोपर्यंत त्यांना मदत जाहीर होणार नाही, तोपर्यंत आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही.

-नितेश राणे, भाजप आमदार

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply