पनवेल : रामप्रहर वृत्त
तोड कारवाई करण्यापूर्वी स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे व्यावसायिक पुनर्वसन करून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी भाजप पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 2च्या वतीने तळोजा एमआयडीसीकडे मंगळवारी
(दि. 17) करण्यात आली. यासंदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एमआयडीसीच्या अधिकार्यांना निवेदन देऊन चर्चा केली.
या शिष्टमंडळात नगरसेवक संतोष भोईर, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, युवा मोर्चाचे महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, ज्येष्ठ नेते कृष्णा पाटील, राम पाटील, अशोक साळुंखे, लहू ढोंगरे यांचा समावेश होता.
तळोजा एमआयडीसीतील काही दुकाने, गॅरेज व काही कार्यालयांवर अतिक्रमणविरोधी तोड कारवाई करण्यात येणार आहे. या बांधकामांना कुठल्याही प्रकारची नोटीस अथवा पूर्वसचना दिलेली नाही. शिवाय ही बांधकामे स्थानिक लोकांची असून गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करून स्थानिक प्रकल्पग्रस्त आपली रोजीरोटी चालवत आहेत. स्थानिकांच्या जमिनी कवडीमोल भावात घेऊन त्यांना उद्ध्वस्त केले आहे. सरकारी नियमानुसार आवश्यक रोजगार न दिल्यामुळे आज त्यांना अशा ठिकाणी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. अशातच तोड कारवाईमुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार आहे.
या पार्श्वभूमीवर परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे व्यावसायिक पुनर्वसन करून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अन्यथा कोणत्याही बांधकामाला हात लावू देणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशी भूमिका स्पष्ट करीत होणार्या परिणामांना एमआयडीसीच सर्वस्वी जबाबदार असेल, असेही सूचित करण्यात आले आहे.