पेण : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी त्याचबरोबर कोळी बांधवाना डिझेल परतावा मिळावा, अशी आग्रही मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली.
समुद्रामध्ये वारंवार होणार्या वादळांमुळे मच्छिमारांना मच्छी मिळणे मुश्किल झाल्यामुळे दुष्काळ जाहीर करून रायगडमधील कोळीबांधवांना डिझेल परतावा मिळावा, तसेच शेतकर्यांना नुकसान भरपाईपोटी करण्यात येणार्या रकमेत वाढ करावी अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी सभागृहात बोलताना केली.
पेण तालुक्यातील शेतकर्यांच्या जमिनी रिलायन्स कंपनीने खरेदी करून जवळजवळ 15 वर्ष झालेत तरी त्या जमिनींचा विकास केला नाही. या जमिनी शेतकरी कसत असला तरी सातबार्यावर शेतकर्यांची नावे नाहीत, यामुळे या जमिनी संबंधीत शेतकर्यांच्या नावावर व्हाव्यात, तसेच महसुल खात्यातील रिक्त असलेल्या जागा त्वरीत भराव्यात, असे अनेक मुद्दे पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी विधानसभा सभागृहात उपस्थित केले.
एमएमआरडीएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी येत असून तो निधी मार्गी लागण्यासाठी पद्धतशीर आराखडा व योजना होणे गरजेचे आहे, यासाठी वाढीव कर्मचारी भरती करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.