Breaking News

अवैध दारूचा जागोजागी महापूर!

केंद्र शासनाने राष्ट्रीय आणि राज्यमार्ग या ठिकाणी दारू विक्रीला निर्बंध आणले होते. रस्ते अपघातात होणारे मृत्यू लक्षात घेऊन रस्त्याच्या कडेला दारूविक्री बंद करण्यात आली होती. त्या वेळी उत्पादन शुल्ककडून करण्यात आलेल्या नाकेबंदीमुळे केवळ वाइन शॉपवर दारू मिळायची. त्यात जागोजागी उभ्या राहिलेल्या बीअर शॉपी या निर्णयाच्या कचाट्यात आल्या होत्या, पण आता तर राज्यात रस्त्यामध्ये कुठेही ढाबा दिसला की तेथे दारू मिळते. राज्य शासनाने यावर अंकुश लावण्याची आवश्यकता आहे.

बीअर विक्रीला सर्वत्र परवानगी आहे, तर अन्य प्रकारची दारू  ही उत्पादन शुल्क विभागाने परवाना दिलेल्या दुकानांत आणि बारमध्ये मिळायची. शासनाने केलेल्या नियमाची अंमलबजावणी 2017मध्ये सर्वत्र कडकपणे करण्यात आली होती. त्या वेळी गावोगावी उभे राहिलेले बीअर शॉप बंद पडले होते आणि वाइन शॉपमध्ये दारू  मिळत असल्याने ती खरेदी करण्यासाठी ग्राहक दूरदूर जात असल्याचे चित्र दिसले होते, पण तरीही सर्वच भागात दारू ही चोरट्या पद्धतीने मिळत होती, हे उत्पादन शुल्क विभाग नाकारू शकत नव्हते. वाइन शॉपमध्ये पार्सल नेणारे असंख्य लोक आपल्या जेवण देण्यासाठी सुरू केलेल्या ढाब्यावर ग्राहकांना चढ्या दराने दारूची विक्री करायचे. त्यामुळे निर्बंध होते ते रस्त्याचा नियम लागू झालेल्या दुकानदारांना. कारण त्यांनी आपल्या बीअर शॉपी या उत्पादन शुल्क विभागाच्या

नाराजीनंतर बंद केल्या होत्या आणि ढाब्यावर सर्रास दारू मिळत होती. त्यानंतर शासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार केल्यानंतर पुन्हा एकदा बीअर शॉपी उघडल्या. त्या वेळी उत्पादन शुल्क विभागाने परवानग्या दिल्यानंतर पुन्हा एकदा बीअर शॉपी उघडल्या.त्याच वेळी रस्त्याच्या आजूबाजूला बंद करण्यात आलेले बारदेखील उघडले गेले.त्या वेळी वाइन शॉप, बीअर शॉपी आणि बार यांनी आपले परवाने उत्पादन शुल्क विभागाची फी भरून सुरू केले, मात्र त्या सर्व दुकानदारांना मागील वर्षभरापासून एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. ती म्हणजे अवैधरीत्या विक्री होत असलेली दारू. बीअर शॉपी जागोजागी असल्याने त्यांचा पूर्वीदेखील बार चालविणार्‍यांना फरक पडत नव्हता, पण ढाब्यांवर, चायनीजच्या दुकानात मिळणारी दारू ही आता लाखो रुपये कराच्या रूपात भरणार्‍यांना नुकसानीची ठरत आहे.

कर्जत तालुक्यात गावागावात आणि शहराच्या रस्त्याच्या कडेला असणार्‍या ढाब्यांवर बेकायदा दारूविक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्या ढाब्याच्या मालकांची चांदी असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गिर्‍हाईक ओढले आहेत, मात्र शासनाकडून अधिकृत परवाना घेऊन व्यवसाय करणारे बारचे मालक यामुळे हवालदिल झाले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाला लाखो रुपयांचा महसूल भरूनही गिर्‍हाईक बारमध्ये फिरकत नसल्याने तालुक्यातील बारमालकांवर डोक्याला हात मारून बसण्याची वेळ आली आहे. ढाब्यांवर बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर कारवाईचा प्रयत्न उत्पादन शुल्क विभाग करीत नाही हे दिसून येत आहे.

दारू ही वाईटच. त्यामुळे अनेक राज्यांत दारू उत्पादन आणि विक्री ही पूर्णपणे बंद आहे, मात्र दारूनिर्मिती आणि विक्रीमधून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा होतो ही बाबही तितकीच खरी आहे. मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने दारू विक्रीवर निर्बंध घातल्यानंतरदेखील राज्यमार्गापासून 500 मीटर अंतर दिल्यानंतर अनेक वाइन शॉप, परमिट रूम बंद झाले होते, पण या निर्णयाने विक्रेत्यांना जेवढा फटका बसला तेवढाच या निर्णयाने शासनाच्या महसुलातदेखील

फरक पडला.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेच हे निर्बंध मागे घेण्यात आले. असे असले तरी विक्रेत्यांवरील संकट काही संपले नाही. कारण वाइन शॉप आणि बार परत सुरू झाले असले तरी आता त्यांना सर्वाधिक स्पर्धा आहे ती रस्त्यांवरील ढाबा मालकांनी चोरट्या पद्धतीने सुरू केलेल्या दारू विक्रीची. कर्जत तालुक्यातील आडबाजूला असलेल्या आणि मुख्य

रस्त्यांवरदेखील तेथे असलेल्या ढाब्यांवर, चायनीज कॉर्नरमध्ये दारू हमखास अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास गिर्‍हाईकांना सर्रास हवी ती आणि हवी तेवढी पुरवली जाते. त्यामुळे या बेकायदेशीर दारू पुरवठा होणार्‍या ढाब्यांकडे गिर्‍हाईके आकर्षित होत आहेत.

दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाला नियमित लाखो रुपये खर्च करून उभारलेले बार ओस पडू लागले आहेत. कधी काळी गजबजाट असताना आता त्याच ठिकाणी एखादी व्यक्ती दिसायला लागल्याने बार मालकांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. या बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर कारवाई होताना दिसत नसल्याने त्यांचे चांगलेच फावले आहे. तेव्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने या बेकायदेशीर दारू विकणार्‍या ढाब्यांवर कारवाई करावी, असा सूर बार मालकांकडून आळवला जात आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग  अशा बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करत असते. आम्हाला अशा बेकायदेशीर दारू विक्रीची तक्रार मिळाली, तर आम्ही लागलीच कारवाई करतो. नागरिकांनीही सजग राहून अशा बेकायदेशीर कृत्याची आम्हाला माहिती कळवावी, असे आवाहन या माध्यमातून आम्ही नागरिकांना करीत आहोत, असे राज्य उत्पादन शुल्कचे उपअधीक्षक संजय भांबळ यांनी स्पष्ट केले आहे.

कर्जतमध्ये अनेक ठिकाणी ढाब्यांवर आणि दुकानातून रात्रीची अनधिकृत दारू विक्री करण्यात येते, तसेच अनेक ढाब्यांवर सर्रासपणे दारू विक्री अथवा पिण्यास परवानगी देण्यात येते. यामुळे कर्जतमधील अनेक बारना याचा फटका बसत आहे. अशी अनधिकृत दारूविक्री लवकर बंद करण्यात येणे गरजेचे आहे. आम्ही शासनाला दरवर्षी अधिकृत फी भरतो, पण या अनधिकृत दारू विक्रीमुळे परमिट रूम आणि बारचालक यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे, असे बारमालक जाहीरपणे बोलत आहेत. त्यामुळे उत्पादन शुल्क विभाग चोरट्या पद्धतीने दारूची विक्री करणार्‍या दुकानमालक, ढाबाचालक तसेच चायनीजच्या कॉर्नरवर कधी कारवाई करणार, असा प्रश्न शासनाला करोडोंचा महसूल फीद्वारे भरणारे परमीट रूम मालक, बारमालक करीत आहेत.

-संतोष पेरणे

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply