पनवेल शहर पोलिसांकडून जनजागृती फलक
पनवेल : वार्ताहर
सणासुदीचे दिवस…खरेदीची लगबग…अन् महिलांची दागिणे घालून बाहेर पडण्याची हौस…सारे काही चोरांच्या पथ्यावर पडणारे…म्हणून महिलांनो, घराबाहेर पडताना सावध राहा…गळ्यातील दागिणे, हातातील बॅग, मोबाइल सांभाळा व होणार्या अप्रिय घटना टाळत मालमत्तांचे स्वसंरक्षण करून चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पनवेल शहर पोलिसांनी केले आहे. यासंदर्भात महत्वाच्या ठीक ठिकाणी जनजागृती फलक उभारण्यात आले आहेत.
सणासुदीच्या दिवसामध्ये सोनसाखळी चोरट्यांचे फावते व यातूनच गुन्हेगारी वाढीस लागते हे टाळण्यासाठी व माता भगिनीना आगामी सर्व सण, उत्सव सहकुटुंब उत्साहात साजरे करता यावे या उद्देशाने हे उभारले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कादबाने यांनी सध्याच्या सणासुदीच्या दिवसामध्ये सोनसाखळी चोरट्यांचे फावते व यातूनच गुन्हेगारी वाढीस लागते हे टाळण्यासाठी व माता भगिनीना आगामी सर्व सण, उत्सव सहकुटुंब उत्साहात साजरे करता यावे या उद्देशाने ठीक ठिकाणी जनजागृती फलक उभारले आहेत. त्या फलकांच्या माध्यमातून सोनसाखळी चोरापासून सावध रहा, कुठेही अनुचित प्रकार घडल्यास किंवा माहिती झाल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे (022- 27452333) तसेच तत्काळ फोन नंबर म्हणून 912 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पनवेल परिसरात सध्या चैन स्नॅचिंग, मोटारसायकल चोरी, घरफोडी, बॅग लिफ्टींग, मोबाइल चोरीचे प्रकारामध्ये वाढ झाली आहे. अशा प्रकारचे गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरिता जनतेनेच स्वतःच काळजी घेवून नुकसान टाळावे, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. महिलांनी मॉर्निंग वॉक तसेच बाजारात व इतर ठिकाणी जातांना परिधान केलेले दागिने हे व्यवस्थित झाकलेले असावेत. शक्यतो मॉर्निग वॉकला जातांना दागिने परिधान करू नयेत तसेच एकटे जाणे टाळण्याचे आवाहनही पोलिसांनी केले. कोणत्याही अनोळखी व्यक्तींसोबत बोलताना दागिन्यांची व पर्सची तसेच मोबाइल फोनची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली.