मुंबई : प्रतिनिधी
भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट मालिकेत शेवटच्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाचा वरिष्ठ खेळाडू महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे रांचीत झालेला सामना हा धोनीसाठी घरच्या मैदानावर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो.
टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर माध्यमांशी बोलताना म्हणाले, शेवटच्या दोन सामन्यांसाठी आम्ही काही बदल केले आहेत. माही या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये खेळणार नाही. त्याला विश्रांती देण्यात येणार आहे. पुढे ऑक्टोबरपर्यंत भारताचे घरच्या मैदानावर सामने होणार नाहीत. त्यामुळे धोनीसाठी शुक्रवारचा सामना घरच्या मैदानावरचा शेवटचा सामना असेल.
दरम्यान, असे असले तरी झारखंड क्रिकेट असोसिएशनने म्हटले की, धोनीला योग्य प्रकारे निरोप देण्यासाठी पुढील वेळी भारतात होणार्या मालिकेत धोनीसाठी मर्यादित षटकांचा एक सामना खेळवण्यात येईल. सध्याच्या मालिकेतील मोहाली आणि दिल्लीत होणार्या शेवटच्या दोन समन्यांमध्ये धोनी खेळणार नसल्याने ऋषभ पंत या सामन्यांसाठी यष्टीरक्षकाची भूमिका बजावेल. धोनीबरोबरच भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सामीच्या पायाला दुखापत झाल्याने तोदेखील शेवटच्या सामन्यांमध्ये खेळणार नाही.