पनवेल : रामप्रहर वृत्त
सायन-पनवेल महामार्गाला जोडणार्या कोपरा पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील यांनी सिडकोच्या अधिकार्यांकडे केली आहे.
खारघर शहरात सिडकोच्या माध्यमातून सुरु असलेली विविध विकासकामे आदींसह सायन-पनवेल महामार्गाला जोडणार्या कोपरा पुलाच्या दुरुस्तीचे काम सिडकोच्या माध्यमातून सुरु आहे. या सर्व कामांची पाहणी सिडको अधिकार्यांसोबत पनवेल महानगर पालिकेचे स्थायी समिती सभापती यांनी गुरुवारी (दि. 26) केली.
या पाहणी दौर्यात प्रामुख्याने खारघर शहरातून सायन-पनवेल महामार्गाला जोडणार्या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाचे समावेश होते. मागील वर्षभरापासून कोपरा पुलावरील वाहतूक बंद आहे. संबंधित पूल धोकादायक असल्याने सिडकोने याठिकाणावरून वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. याठिकाणची वाहतूक पर्यायी पुलावर वळविल्याने या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. अनेक वेळा वाहन चालकांमध्ये बाचाबाचीचे प्रकार देखील याठिकाणी घडत असून या पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरत लवकर पूर्ण करण्याची मागणी पनवेल महानगर पालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांनी केली.
या वेळी सिडकोचे अभियंता संजय पुदाळे, नगरसेवक रामजी बेरा, आंबाभाई पटेल हे देखील उपस्थित होते. कोपरा पुलावरील वाहतूक कोंडी ही शहरातील महत्वाची समस्या बनली आहे. सकाळ सायंकाळी वाहन चालकांना याठिकाणी वाहतूक कोंडीत रखडावे लागत आहे. यासंदर्भात खारघर शहरातील रहिवासी, सामाजिक संघटनांनी प्रवीण पाटील यांच्याकडे धाव घेत लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याची विनंती केली होती. या पुलाचे काम किती झाले आहे. यासंदर्भात सिडको अधिकार्यांसोबत पाहणी करून या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाची माहिती घेतली.
संबंधित काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशा सूचना कंत्राटदाराला देण्यात आल्याची माहिती सिडकोचे अधिकारी संजय पुदाळे यांनी दिली. संबंधित काम जानेवारी महिनाअखेर पूर्ण होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे पुदाळे यांनी सांगितले.