पनवेल : रामप्रहर वृत्त
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दि. 26) मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामांची भर पावसात केली पाहणी केली. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांना जो काही त्रास होतोय तो होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा. गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करून वाहतूक सुरळीत करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी संबंधित यंत्रणांना दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाहणी दौर्याला पनवेलमधील पळस्पे येथून सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांसमवेत खासदार श्रीरंग बारणे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, आमदार भरत गोगावले, आमदार रविशेठ पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, शिवसेनेचे परेश पाटील, रामदास शेवाळे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात झाली आहे. पहिली टेक्नॉलॉजी एम 60 आरएफसी आणि लिओ पॉलिमर पद्धत, दुसरी रॅपिडेक्स हार्डनर एम 60 पद्धत आणि तिसरी डीएलसी पद्धत. या तीन आधुनिक पद्धतींनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे चौथी पद्धत ब्रिक्स कास्ट एम 60 ही पद्धत. या पद्धतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी संपूर्ण टीम काम करीत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी स्वतः या कामावर लक्ष ठेवून आहेत तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष घातले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
जे जुने कंत्राटदार काम सोडून पळाले आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …