खोपोली ः प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या मोरबे धरणपात्रात जाणार्या धावरी नदी परिसरात वाळूमाफियांनी धुडगूस घातला असून, या माफियांना वेळीच आवरा, अशा आशयाचे लेखी निवेदन बोरगाव खुर्द आणि सोंडेवाडी ग्रामस्थांनी खालापूर तहसील कार्यालयात दिले आहे. माथेरानच्या पायथ्याशी मोरबे धरण आहे.
या धरणालगत असलेली गावे, वाड्या बफर झोनमध्ये येत आहेत. धावरी नदी मोरबे धरणाला मिळत असून, या ठिकाणी वाळू मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने वाळूमाफिया जेसीबी आणि डम्परच्या साहाय्याने राजरोसपणे येथे वाळूची खुलेआम लूट करीत आहेत. कोणत्याही प्रकारची शासनाची परवानगी न घेता वाळूची लूट सुरू असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे, शिवाय धरणालादेखील भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो, असे बोरगाव ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाळूमाफियांवर कारवाई व्हावी यासाठी बोरगाव ग्रामस्थांनी खालापूरच्या नायब तहसीलदार कल्याणी मोहिते यांना शुक्रवारी (दि. 27) निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. आता याबाबत काय कार्यवाही होते याकडे बोरगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
धरणपात्रातून राजरोस वाळूची लूट होत असून कोणतेही भय वाळूमाफियांना उरले नाही. याशिवाय वनविभागाच्या हद्दीतून राजरोस वाळूच्या डम्परची वाहतूक होत आहे.
-अनिल भऊड, बोरगाव खुर्द ग्रामस्थ
ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल घेतली आहे. याबाबत सोमवारी बैठक घेणार असून कारवाईसाठी सूचना देणार आहोत. -कल्याणी मोहिते, नायब तहसीलदार, खालापूर