Breaking News

अमली पदार्थांची विक्री करणार्‍या नायजेरीयन नागरिकांना अटक

पनवेल : वार्ताहर

खारघर परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन नायजेरीयन नागरिकांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. 

अमली पदार्थ विरोधी पथकाने या दोघांजवळ असलेले तब्बल 15 लाख 15 हजार रुपये किंमतीचे एम्फेटामाइन पावडरसह मॅसेक्लीन पावडर व एमडीएमएच्या गोळ्या असा अमली पदार्थ जप्त केला आहे. खारघर परिसरात दोन नायजेरीयन नागरिक अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत व त्यांच्या पथकाने गुरुवारी खारघर सेक्टर 34 भागात गुरुद्वारा समोरील बस स्टॉपवर सापळा लावला होता. या वेळी त्याठिकाणी आलेल्या केनिथ समिन केझी (28) या नायजेरीन नागरिकाला पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांसोबत झटापट करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करुन त्याला जेरबंद केले. या वेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यात 2 लाख 60 हजार रुपये किंमतीची 52 ग्रॅम वजनाची एम्फेटामाईन पावडर आढळुन आली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे या अमली पदार्थाबाबत अधिक चौकशी केल्यानंतर त्याने हे अमली पदार्थ कोपरागावात समर्थ कृपा इमारतीत रहाणार्‍या नामेनॉन डोझी इजिकेसिरिल (44) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्या घरावर छापा मारुन नामेनॉन डोझी याला अटक करुन त्याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या जवळ 5 लाख 35 हजार रुपये किंमतीचे 107 ग्रॅम मॅसेक्लीन पावडर आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी  हा अमली पदार्थ जप्त करुन पहिला नायजेरीयन केनिथ समिन केझी (28) याच्याही घराची झडती घेतली असता, त्याच्या घरात 7 लाख रुपये किंमतीचे 100 नग एमडीएमए गोळ्या आढळुन आल्या. त्याशिवाय त्याच्या घरात अंमली पदार्थ मोजमाप करण्याचा वजन काटा, टेस्ट ट्युब, दोन मोबाईल फोन आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करुन दोघा नायजेरीयन नागरिकांना एनडीपीएस कलमान्वये अटक केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करा -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी कधीही धर्मभेद न करता सर्व समाज बांधवांना …

Leave a Reply