अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतीय अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नॅशनल इन्फ्रा पाइपलाइन योजनेंतर्गत पायाभूत सुविधांसाठी पुढील पाच वर्षांसाठी 102 लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (दि. 31) पत्रकार परिषदेत केली.
या गुंतवणुकीमुळे केंद्र व राज्यांच्या आखत्यारितील 39 टक्के, तर खासगी क्षेत्रातील 22 टक्के प्रकल्प मार्गी लागतील. या योजनेत वीज, रेल्वे, शहरी पाणीपुरवठा, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित प्रकल्पांचा समावेश असेल, असे सीतारामन यांनी या वेळी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणातून 100 लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीची घोषणा केली होती. त्यानंतर यासाठी एका टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली होती. त्यानुसार या टास्क फोर्सने 102 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प निश्चित केले आहेत.