किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देणारे खरे आधुनिक मावळे : वाडकर
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील पेठ गावाच्या पाठिमागे उभा असलेल्या कोथळीगडाचा मुख्य दरवाजा आता बंदिस्त झाला आहे. त्यासाठी 700 किलो वजनाचा सागवान दरवाजा तेथपर्यंत नेऊन या किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देणारे आताच्या युगातील तरुण खरे मावळे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी नुकताच केले. सह्याद्री प्रतिष्ठानच्या कर्जत विभागाने कोथळी गडावर बसविलेल्या सागवानी दरवाजाचा लोकापर्ण सोहळा भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, मुळशी पॅटर्न अभिनेता रमेश परदेशी यांच्यासह शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी गडाचा दरवाजा तयार करणारे बबन पारधी आणि अवघ्या आठव्या वर्षी लिंगाणा सर करणारा कार्तिक भरत मोरे या चिमुकल्याचा विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला पेठ गावचे सरपंच दत्ताभाऊ पिंपरकर, पोलीस पाटील आशा गोपाल सावंत, प्रगत शेतकरी मंगेश सावंत, जितेंद्र पाटील, अभिजित घरत, दिलीप ताम्हाणे यांच्यासह कर्जत पोलीस, परिसरातील शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, दुर्गसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तत्पुर्वी गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ गावाच्या वेशीपासून ढोल ताशांच्या गजरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत पालखीचे गडावर प्रस्थान झाले. यावेळी संतोष पिंपरकर, मंगेश सावंत, हेमंत ठाणगे, नगरसेवक संकेत भासे, तसेच प्रसाद थोरवे, पवन मेदगे, कुंदा ठाणगे, भारती तलपे यांच्यासह खालापूर, पनवेल, पेण, मुबंई, मुरबाड, अलिबाग, सातारा व कोकणातील अनेक शिवप्रेमी व दुर्गप्रेमी उपस्थित होते. गडावरील सोहळा आटोपल्यानंतर गडाच्या पायथ्याशी उभारलेल्या मंडपात ज्यांनी दुर्गसंवर्धन करण्याचे कार्य केले आहे, त्यांना सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने दुर्गमित्र या प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.