Sunday , October 1 2023
Breaking News

सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहावे -मिलिंद पोंक्षे

अलिबाग : जिमाका

महिला व बालकांबाबतचे गुन्हे, लैंगिक अत्याचार आणि फसवणूक करताना अनेक समाजकंटक इंटरनेटचा वापर करत आहेत. जिल्ह्यात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शासन प्रयत्नशील असून महिला व बालकांनीही सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे, असे आवाहन विरार येथील जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचे मिलिंद पोंक्षे  यांनी केले आहे. सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून अलिबाग येथील जेएसएम कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून मिलिंद पोंक्षे बोलत होते. यावेळी लॉ कॉलेजच्या प्राचार्य अ‍ॅड. रेश्मा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कदम, स्वाती पवार, पोलीस निरीक्षक कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक साखरकर आदि उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना पोंक्षे म्हणाले की,  सार्वजनिक ठिकाणाहून जाणार्‍या मुलींची छेडछाड, पाठलाग करणे, वाईट नजरेने बघणे अशा अनेक घृणास्पद घटना वारंवार उजेडात येत असल्याने शालेय विद्यार्थीनींमध्ये निर्माण झालेले असुरक्षिततेचे भयचक्र भेदण्यासाठी महाराष्ट्र सायबरच्या वतीने जिल्ह्यात ‘सायबर सेफ वुमन’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. डिजिटल युगात गुन्हेगार इंटरनेटचा वापर करून सायबर गुन्हे करत आहेत. त्यातून महिला व बालकांचे लैंगिक शोषण व फसवणूक करत आहेत. अशा घटनाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी सायबर सेफ वुमन ही मोहीम महत्त्वाची ठरेल, असा विश्वास मिलिंद पोंक्षे यांनी या वेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच जेएसएम कॉलेज, जनरल अरुण कुमार वैद्य महाविद्यालय, जा. र. कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply