पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील पिरकोन येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या एसएससी 1989मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी रविवारी (दि. 12) शांतीवन नेरे येथील रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांसमवेत मकरसंक्रांतीच्या तिळाचा गोडवा हा सदाबहार कार्यक्रम साजरा केला. सामाजिक आणि शैक्षणिक कार्याच्या हेतूने या गु्रपची स्थापना केली गेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रुपमधील सदस्यांनी वृद्धाश्रमात संक्रात सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. या वेळी याच ग्र्रुपमधील गायक देवेंद्र पाटील, वृषाली पाटील आणि राजेंद्र ठाकूर यांनी सुमधुर अशी भावगीते, भक्तिगीते आणि देशभक्तीपर गीते असा सदाबहार कार्यक्रम सादर केला. सामाजिक स्तरावर कार्यक्रम करण्याची जी मनात आवड आहे ती या सेवेतून दिसून आली. उपस्थित ज्येष्ठांनी या मित्रपरिवारासमवेत आपल्या भावना व्यक्त करून मन मोकळे केले. कार्यक्रमाचे निवेदन समता ठाकूर यांनी राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून केले. दरम्यान, यानिमित्त सुयश क्लास आणि निगा फाऊंडेशनचे संचालक निवास गावंड, मनोज पाटील तसेच सेवानिवृत्त भारतीय जवान संतोष ठाकूर आदींनी आपली उपस्थिती दर्शवून आनंद द्विगुणित केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वृद्धाश्रमाचे प्रशासकीय अधिकारी नंदकुमार उरणकर, ग्रुपमधील कृष्णा पाटील, सुभाष म्हात्रे, कांचन थळी, कांचन म्हात्रे, संतोष पाटील, शामकांत पाटील, प्रदीप पाटील, मनोज गावंड, प्रवीण गावंड, विनोद ठाकूर, शेखर म्हात्रे, दिलीप थळी आदींनी सहकार्य केले. लक्ष्मीकांत म्हात्रे यांनी संस्थेचे आणि उपस्थितांचे आभार मानले.