पनवेल ः वार्ताहर
भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून कर्ज देण्याच्या बहाण्याने चार ते पाच जणांनी मिळून कळंबोली स्टील मार्केटमधील एका गॅरेज चालकाची लाखो रुपयाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
शहा फैजल मेकराणी याने कळंबोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचे स्टील मार्केट कळंबोली येथे गॅरेजचे दुकान आहे. काही महिन्यापूर्वी ते आपल्या गॅरेजमध्ये असताना प्रिया नावाच्या एका महिलेने त्यांना मोबाईलवर फोन केला व मी भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स कंपनी येथून बोलत आहे असे सांगून त्यांना कंपनीबाबत माहिती दिली व कंपनीमध्ये 50 हजार रुपये भरुन पॉलिसी घेतली तर तुम्हाला 5 लाखाचे कर्ज मिळेल असे सांगितले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांना विशाल जैन नावाच्या व्यक्तीने मोबाईलवर फोन करून कंपनीच्या त्याच पॉलिसीबाबत माहिती दिली.
मेकराणी यांना कर्जाची आवश्यकता असल्याने त्यांनी अज्ञाताने दिलेल्या खाते नंबरमध्ये 50 हजार रुपये जमा केले. त्यानंतर शहजाद दळवी नावाच्या व्यक्तीने फोन करून मी भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स कंपनीचा डायरेक्टर बोलत असून सदर कंपनीचे नियम बदलले असून तुम्हाला कर्ज घेण्याकरिता पुन्हा 50 हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यामुळे मेकराणी यांनी पुन्हा 50 हजार रुपये दिलेल्या खातेनंबरवर जमा केले असे मिळून त्यांनी 1 लाख रुपये जमा केले. मात्र त्यानंतर पुन्हा वरुण नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून तुमचा राहण्याचा पत्ता तपासणी करीत असल्याचे सांगितले व कर्ज 2 दिवसांत तुमच्या खात्यावर जमा होईल असे सांगितले. दोन दिवसांनी त्यांनी आलेल्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्व मोबाईल नंबर बंद मिळून आले. त्यामुळे या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.