Wednesday , February 8 2023
Breaking News

रायगड शिवसेनेच्या नाराजीचा फुसका बार

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकारकडून निष्ठावंतांना डावलले आणि नव्यांना संधी दिली यावरून सर्वसामान्य शिवसैनिक मात्र चांगलाच संतप्त झाला. एकीकडे आ. भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने तसेच दुसरीकडे पालकमंत्रिपदावरून जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी नाराज असल्याचा कांगावा करण्यात आला होता, मात्र सेनाप्रमुखांनी वेळ नाकारली आणि तटकरेंनी सतरंजवर असे काही फासे फेकले की रायगडातले सेनेचे हे नाराजीचे टायगर बॉम्ब अखेर फुसके बार ठरले.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे नव्या सरकारचे नवे समीकरण राज्याने पाहिले, मात्र निष्ठावंतांना या सरकारमध्ये मंत्रिपदाचा लाभ घेता आला नाही. रायगड जिल्ह्यातील ही नाराजी शिवसेना पदाधिकार्‍यांच्या राजीनामासत्रापर्यंत जाऊन पोहचली आहे. याबाबत जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी आणि शिवसैनिकांची

एक बैठक पार पडली. गेली अनेक वर्षे शिवसेनेचे निष्ठेने काम करणार्‍या शिवसैनिकाला मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने रायगडमधील शिवसैनिक संताप व्यक्त करू लागले. रायगड जिल्ह्यात महाड विधानसभा मतदारसंघात तीन वेळा काँग्रेस आणि राष्ट्रवादी उमेदवाराचा पराभव करून रायगडवर भगवा फडकावणार्‍या आ. भरत गोगावले यांना संधी मिळणार ही सामान्य शिवसैनिकांची अपेक्षा होती, मात्र या अपेक्षेवर पाणी फिरवले, तर दुसरीकडे महेंद्र दळवी हेदेखील पालकमंत्रिपदावरून नाराज झाले

असल्याचे बोलले जाऊ लागले. एकंदरीत काय तर सत्तेच्या या सारीपाटात मंत्री आणि पालकमंत्रिपद पदरात पाडून घेऊन तटकरे अव्वल ठरले, तर सत्तेत असूनही शिवसेना आणि काँग्रेस रायगडमधील सत्तेपासून दूर राहिले.  आमदार भरत गोगावले यांनी महाड तालुक्यातील पिंपळदरी सरपंच ते विधानसभा सदस्यापर्यंत प्रवास केला आहे. त्यांनी महाड मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी एकाकी झुंज देत गेली 15 वर्षे तीन वेळा विधानसभेवर विजय मिळवून मतदारसंघात शिवसेनेचा भगवा डौलत ठेवला होता. गेली अनेक वर्षे ते शिवसेनेचे निष्ठेने काम करीत आहेत. भाजप-शिवसेना युतीच्या सरकार काळात गोगावले यांना मंत्रिपद मिळेल, असा विश्वास सैनिकांमध्ये होता, तसेच मंत्रिमंडळ यादीत आपल्या नेत्याचे नाव येईल अशी कायम अपेक्षा रायगडमधील शिवसैनिकांना आणि सर्वसामान्य माणसाला राहिली होती, मात्र महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भूकंप व्हावा अशी घटना घडली. केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर अभद्र आघाडी करून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख यांच्या विचारांची हत्या केली. हिंदुत्व आणि मराठी माणसाचे कट्टर विरोधक असणार्‍या डाव्या विचारसरणीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने सत्ता स्थापन केली, मात्र सोशल मीडियावर ठाकरे यांच्या या निर्णयाविरोधात नेटकर्‍यांनी प्रचंडनाराजी व्यक्त केली. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे असे तीन आमदार निवडून आले आहेत. महाड विधानसभा मतदारसंघात गोगावले यांनी तर तीन वेळा निवडून येण्याचा मान पटकावला, तर दुसरीकडे महेंद्र दळवी यांनीदेखील प्रचंड मतांनी विजय मिळवला आहे. यामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेनेकडे मंत्रिपद देणे आवश्यक असतानादेखील राष्ट्रवादीच्या नव्याने निवडून गेलेल्या आदिती तटकरे यांना मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद दिले गेल्याने रायगडमध्ये शिवसेनेत प्रचंड नाराजी

निर्माण झाली. यावर कळस की काय पालकमंत्रिपदही तटकरेंना देण्यात आल्यामुळे शिवसेनेतील ही नाराजी आणखीनच उफाळून आली, तर काँग्रेसच्या गोटातही अस्वस्थता वाढली. याबाबत शिवसैनिक उघडउघड नाराजी बोलून दाखवू लागले. पदाधिकार्‍यांच्या बैठका रंगल्या. ठराव मांडण्यात आले. याबाबत शिवसेनेचे एक शिष्टमंडळदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यास गेले, मात्र उद्धव ठाकरे यांची भेट न झाल्याने हे शिष्टमंडळ माघारी फिरले.

रायगडच्या राजकारणात खा. सुनील तटकरे हे नेहमीच अव्वल ठरले आहेत. शेकापची समजूत काढून मुलगी आदिती तटकरेला जिल्हा परिषद अध्यक्ष केले, तर काँग्रेसला गुंडाळून मुलगा अनिकेत तटकरे याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आणले. तसेच शिवसेनेतील गीतेंविरोधातील नाराजीचा फायदा घेत स्वत: खासदार म्हणून निवडून आले. हीच कमाल त्यांनी महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर करून दाखवली. शिवसेनेचे तीन आमदार असतानाही केवळ एक आमदार असूनही आपले राजकीय वजन वापरून मुलीसाठी मंत्रिपद मिळविले आणि कळस म्हणजे सुभाष देसाई यांचे नाव पालकमंत्रिपदासाठी चर्चेत असताना आदिती तटकरेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ दस्तुरखुद्द ठाकरेंच्या हस्ते घालून घेतली. एकीकडे माजी मंत्री रामदास कदम, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले भास्कर जाधव, माजी मंत्री दीपक केसरकर यांचादेखील मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. यामुळे रायगडसह कोकणात शिवसेनेत खदखद निर्माण झाली, मात्र भास्कर जाधव आणि गोगावले यांच्या व्यतिरिक्त अद्याप याबाबत उघडपणे कोणी बोलले नाही. शिवसेनेत नव्यांना संधी देणे रायगड आणि कोकणातील जनतेला रुचले नसल्याने गेली काही दिवस शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत बैठका रंगत आहेत. राजीनामा देण्याच्या धमक्या दिल्या जाऊ लागल्या, मात्र सेनेकडून वाढणार्‍या या विरोधाच्या गाडीला तटकरेंनी ब्रेक लावला. नुकतेच एका कार्यक्रमात आ. गोगावले यांनी तटकरेंनी मला वेळोवेळी मदत केली आहे, असे विधान करून विरोधाच्या या रणांगणातून सपशेल माघार घेतली, तर गोगावले हे माझे जवळचे मित्र आहेत, असे म्हणून तटकरे यांनी शिवसेनेचा नाराजीचा बार किती फुसका आहे हे दाखवून दिले. रायगडच्या राजकीय पटलावर तटकरे यांनी शेकाप संपवली, काँग्रेस संपविली आणि आता ते शिवसेना संपवतील हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्याची गरज नाही. तटकरेंचा हा अश्वमेध थोपवण्याची ताकद आता केवळ भाजपमध्येच आहे. आ. प्रशांत ठाकूर आणि वि. प. विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकरांनी तटकरेंचा हा सत्तेने मदमस्त झालेला हत्ती रोखण्यासाठी शिवधनुष्य उचलावे, अशी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आणि हेच भविष्यातील रायगडाच्या हिताचेही आहे.

-महेश शिंदे

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply