Breaking News

विवेक पाटलांनी पोकळ आश्वासने देण्याऐवजी आमचे पैसे परत करावेत

ठेवीदारांची खारघरमध्ये जोरदार मागणी ;
दिशाभूल व थापेबाजीविरोधात तीव्र संताप

पनवेल : रामप्रहर वृत्त
रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन करीत हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारे आणि गोरगरीब खातेदारांचे पैसे बळकावणारे कर्नाळा बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार व शेकाप नेते विवेक पाटील यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, मात्र तरीही मोठमोठ्या वल्गना करून ठेवीदारांची दिशाभूल करण्याचे त्यांचे काम चोखपणे सुरू आहे. त्यामुळे कष्टाने जमा केलेली आयुष्याची पुंजी गिळंकृत करणारे कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील व संचालकांवर कडक कारवाई व्हावी, तसेच आमचे पैसे आम्हाला परत मिळावेत, अशी जोरदार मागणी शनिवारी (दि. 1) खातेदार, ठेवीदारांनी पुन्हा एकदा खारघर शाखेत जमून केली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत, याचा पुनरूच्चार ठेवीदारांशी संवाद साधताना केला.
कर्नाळा बँक घोटाळ्यामुळे ठेवीदार आणि खातेदारांची अत्यंत बिकट व संकटकालीन परिस्थिती झाली आहे. अनेक वेळा पैसे परत करण्याची मागणी ठेवीदारांनी करूनही विवेक पाटील यांना काही पाझर फुटला नाही. अखेर संयमाचा बांध फुटलेल्या ठेवीदारांनी बँकेच्या खारघर येथील शाखेत बुधवारी ठिय्या आंदोलन करून विवेक पाटील यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला. ठेवीदारांना बुधवारी पैसे दिले जातील, असे आश्वासन कर्नाळा बँक व्यवस्थापनाकडून देण्यात आले होते, मात्र ऐनवेळी शब्द फिरवून पैसे न दिल्याने ठेवीदारांनी खारघरमधील बँकेतच ठाण मांडलेे. हक्काचे पैसे घेतल्याशिवाय बाहेर पडणार नाही, असा पवित्रा ठेवीदारांनी घेतल्याने विवेक पाटील यांना रात्री 10 वाजता बँकेत यावे लागले. त्यांनी शुक्रवारी पैसे देण्याचे जाहीर आश्वासन ठेवीदारांना दिले होते, मात्र शुक्रवार उजाडला आणि फक्त 50 ठेवीदारांना तेही अवघे प्रत्येकी चार हजार रुपये दिले गेले. ते पाहता विवेक पाटील यांनी पुन्हा एकदा ठेवीदारांना चुना लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. ठेवीदारांना त्यांचे पैसे शुक्रवारी परत करतो, असे छातीठोकपणे सांगणार्‍या विवेक पाटील यांनी अवघे चार हजार रुपये परत केले. खातेदारांची संख्या शेकडो आणि प्रत्यक्षात फक्त 50 खातेदारांना पैसे देण्याची नामुष्की पाटील यांच्यावर आली. त्यामुळे त्यांच्या शब्दाला किंमत उरली नसल्याची चर्चा रंगली होती.
आपले पैसे घेण्यासाठी ठेवीदारांनी शनिवारी पुन्हा खारघर शाखा गाठली, मात्र विवेक पाटील यांनी त्यांच्या पदरी निराशाच आणली. त्यामुळे ठेवीदार आणि खातेदारांनी विवेक पाटील यांच्या नावाने संताप तर व्यक्त केलाच, शिवाय कडक कारवाईची मागणीही केली. प्रसिद्धिमाध्यमांसमोर ठेवीदारांनी आपल्या व्यथा मांडल्या. यामध्ये कुटुंबीयांच्या भविष्याची चिंता प्रकर्षाने दिसून आली. एका वृद्ध महिलेने आपली व्यथा मांडताना सांगितले की, 10 वर्षांपूर्वी माझ्या मुलीचे आणि जावयाचे निधन झाले. त्यांचा मुलगा म्हणजेच माझा नातू लहान आहे. त्याच्या संगोपनासाठी व पुढील भविष्यासाठी एक-एक रुपया जोडून कर्नाळा बँकेत साडेतीन लाख रुपये जमा केले. लोकांच्या घरात मी धुणीभांडी करून उदरनिर्वाह करीत आहे. एवढे कष्ट करीत असताना आयुष्याची पुंजी मला बँकेकडून परत मिळत नाही. बँक माझी वेदना का समजून घेत नाही? मला माझे पैसे बँकेने द्यावेत, ही विनंती, अशा शब्दांत तिने पाणावलेल्या डोळ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, तर 70 लाख बँकेत असतानाही बँक मला ब्लॉकेजचे ऑपरेशन करायला तीन लाख रुपये देत नाही यासारखी दुर्दैवी बाब काय असणार? जीवनाचा प्रश्न असताना स्वतःच्याच पैशांसाठी बँक वणवण करायला लावत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया एका रुग्णाने दिली.
पनवेलमध्ये एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानात काम करणारे प्रदीप पाटील एका कर्जदाराला जामीनदार आहेत ही बाब दोन दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून समोर आली आणि त्यांना जोरदार झटकाच बसला. यासंदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की, माझी आर्थिक परिस्थिती विचारात घेता कर्नाळा बँकेने दीड लाखांचे कर्ज मला दिले नाही, मात्र 10 कोटी रुपयांच्या कर्जाला मला जामीनदार कसे केले, असा प्रश्न मला दोन दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या मेसेजवरून पडला आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने कर्ज आहे, त्याला मी ओळखतसुद्धा नाही. त्यामुळे या बोगस कर्जाला मी कसा जामीनदार, असा सवालही त्यांनी बँकेला केला आहे.
17 शाखा आणि त्यामध्ये 40 हजार खातेदारांचे पैसे कर्नाळा बँकेत अडकले आहेत आणि याचा परिणाम जिल्ह्यातील जवळपास एक लाख लोकांवर झाला आहे. त्यामुळे कर्नाळा बँकेच्या या घोटाळ्यामुळे गोरगरीब संकटात सापडले आहेत. ठेवीदार व खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे.
या वेळी बोलताना ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी म्हणाले की, 80 टक्के एनपीए असताना कोणती बँक कर्नाळा बँकेला विलीन करून घेईल, हा मोठा प्रश्न असताना विवेक पाटील मात्र विलीनीकरणाच्या बाता वारेमापपणे मारत आहेत. बाता मारण्यापेक्षा लोकांच्या पैशांतून जमा केलेली प्रॉपर्टी विका, पण ठेवीदारांचे पैसे द्या. आम्ही सहकारमंत्री, त्यांचे सचिव, आरबीआय अधिकारी यांची भेट घेऊन लोकांचे पैसे देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आणि करीत आहोत, मात्र विवेक पाटील महाविकास आघाडीमध्ये असल्याने या आघाडीचे आशीर्वाद त्यांच्यावर आहेत. म्हणूनच महाविकास आघाडीचे सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाही. असे असले तरी ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात यासंदर्भात आवाज उठवणार आहोत.

घोटाळा स्पष्टपणे उघड झाल्याने ठेवीदारांचे पैसे न देण्यासाठी विवेक पाटील नवनवीन कारणे देत आहेत. ठेवीदारांना त्यांचे पैसे देण्याचा कोणताही आराखडा नाही. उलट वेळ मारून नेण्याचे धोरण आखून पैसे देण्याचे टाळले जात आहे. विवेक पाटील घोटाळा झाला नाही, असे सांगत आहेत, मग ते पैसे का देत नाहीत? आम्हाला यात कोणतेही राजकारण करायचे नाही. ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावेत, हीच आमची आग्रही भूमिका आहे.
-आमदार महेश बालदी, अध्यक्ष, ठेवीदार संघर्ष समिती

कर्नाळा बँकेची पनवेलमध्ये स्थापना झाली त्या वेळी विवेक पाटील यांनी ठेवीदारांना, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना या बँकेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवत पनवेल, उरण व इतर परिसरातील लोकांनी गुंतवणूक केली. काहींनी तर आपल्या जमिनींचे पैसे म्हणजेच आयुष्याची सर्व पुंजी या बँकेत ठेवली. बँकेत 63 बोगस खात्यांच्या माध्यमातून 513 कोटी रुपयांचा घोटाळा स्पष्टपणे उघड झाला आहे आणि हा पैसा विवेक पाटील यांच्या कर्नाळा स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गेला आहे. ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार.
-आमदार प्रशांत ठाकूर, कार्याध्यक्ष, ठेवीदार संघर्ष समिती

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply