कळंबोली : प्रतिनिधी
कळंबोली सेक्टर 16 येथील रोडपाली वसाहतीमधील डिम्पी ओरिजेन या इमारतीमध्ये बुधवारी (दि. 22) रात्री 8. 50 वाजता तिसर्या माळ्यावर सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी जीवित हानी झाली नाही. मात्र दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. कळंबोली डी-मार्ट ते नवी मुंबई पोलीस मुख्यालय रोडवर सेक्टर 16 येथे कृष्णा बार अँड रेस्टॉरंट समोर भूखंड क्रमांक 20 येथे डिम्पी ओरिजेन ही इमारत आहे. सायंकाळी तिसर्या मजल्यावर एका सदनिकांमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने रहिवाशी धावत रस्त्यावर आले. सिलिंडरच्या स्फोटामुळे घराला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच कळंबोली अग्निशमन दलाचे दोन बंब आणि जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अर्ध्या तासामध्ये आग आटोक्यात आणली. दरम्यान, बघ्यांची गर्दी जमली होती. कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान यामध्ये कोणालाही गंभीर इजा झाली नसल्याचे समजते.