शेतमजूर कौशल्य विकास प्रशिक्षणात तज्ज्ञांचा दावा
कर्जत : बातमीदार
शेतमजूर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील वडवली येथे नुकतेच आंबा मोहोर संरक्षण व फवारणी या विषयाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. आंबा उत्पादक शेतकरी या शिबिरात मोठ्या संंख्येने सहभागी झाले होते. तंत्रज्ञानाची जोड दिल्यास आंब्याचे चांगले पीक मिळू शकते, असा दावा या वेळी तज्ज्ञांनी केला.
रोहा किल्ला येथील कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ जीवन आरेकर यांनी या शिबिरात सहभागी झालेल्या शेतकर्यांना मार्गदर्शन केले, तसेच त्यांनी आंबा पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण याविषयी माहिती दिली. कर्जत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी उपस्थित शेतकर्यांना ’विकेल ते पिकेल’ योजनेची माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक व्ही. जे. वानखेडे, कृषी सहाय्यक एस. बी. गोसावी, आर. डी. मते, एम. एस. देशमुख यांनीही या वेळी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. आंब्यावर कोणती फवारणी करावी याबद्दल केलेल्या मार्गदर्शनाचा शेतकर्यांना निश्चितच फायदा होईल, असे मत शिबिरात सहभागी झालेल्या शेतकर्यांनी व्यक्त केले.