खोपोलीत हजारो भाविकांनी घेतले दर्शन


खोपोली : प्रतिनिधी
पूज्य गगनगिरी महाराज यांचा 12 वा समाधी सोहळा मंगळवार व बुधवारी खोपोली येथील गगनगिरी महाराज मठात विविध सामाजिक उपक्रम व हजारो भाविकांच्या दर्शनाने संपन्न झाला. मठाचे मुख्य आशिष भाई महाराज यांच्या देखरेखीखाली हा समाधी सोहळा पार पडला. नगरपालिकेकडूनही आवश्यक सुविधा या निमित्ताने पुरविण्यात आल्या होत्या. यानिमित्ताने गगनगिरी मठात आकर्षक रांगोळ्या व फुलांची सजावट करण्यात आली होती. गगनगिरी मठ व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंसाठी घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषधे वाटपाच्या कार्यक्रमात, मठाकडून परिसरातील आदिवासी महिलांना साड्या व घरातील दैनंदिन गरजेच्या भांड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच महाप्रसाद व दोन दिवस विशेष विविध आध्यात्मिक कार्यक्रम मठात पार पडले. नगराध्यक्ष सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष वनिता कांबळे-औटी यांच्यासह अन्य नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते. समाधी सोहळ्यानिमित्त राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक मठात दाखल झाले होते. बुधवारी खोपोली शहरात गगनगिरी महाराजांच्या प्रतिमेची भव्य रथयात्रा काढण्यात येऊन ही यात्रा समाधी स्थळी समाप्त करण्यात आली.