माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा
उरण : प्रतिनिधी
माघी गणेशोत्सवानिमित्त मंगळवारी (दि. 28) चिरनेर येथील महागणपती मंदिरात पहाटे तीन वाजल्यापासूनच श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगेचा ओघ वाढला होता. अगदी सायंकाळी व रात्री उशिरापर्यंतसुद्धा भाविकांच्या गर्दीने मंदिराचा सभामंडप गजबजून गेला होता. पेशवेकालीन गणपती आणि नवसाला पावणारे दैवत म्हणून प्रचिती असलेल्या चिरनेर महागणपती मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्त कित्येक वर्षे भाविकांच्या गर्दीचा ओघ ओसंडून वाहत असतो. येथे आलेल्या भाविकांच्या आशा-आकांक्षा पूर्णत्वास नेणार्या महागणपतीची महती उरण, पनवेल, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील कानाकोपर्यात पोहचली आहे. भक्तांना येणार्या अनुभूतीमुळे चिरनेर मुक्कामी येणार्या गणेशभक्तांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.यापूर्वी येथे जुने कौलारू मंदिर होते. आता त्याच्या सभामंडपाच्या उत्तरेला भक्तगणांच्या सेवेसाठी भव्य असे सभामंडप साकारण्यात आले असतानाही मंडपाच्या बाहेरील मोकळ्या जागेत उत्सवापुरते अतिरिक्त सभामंडप उभारण्यात येत आहे. त्यामुळे रांगेत दर्शनासाठी उभ्या असलेल्या भाविकांना अधिक वेळ गेला तरी सुलभतेने श्रींचे दर्शन घेता येते. मंगळवारच्या गर्दीने उच्चांक गाठला असतानाही भाविकांनी रांगेतच दर्शन घेणे पसंत केले, तर मनोकामना पूर्ण झालेल्या भक्तांनी 20 ते 30 किमी अंतरावरून पायी दिंडीने येऊन मोठ्या भक्तिभावाने नवस फेडण्यासाठीही मोठी गर्दी केली होती. रात्री गणेशाच्या पालखी सोहळ्यातही हजारो नागरिकांनी सहभागी होऊन श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले.