Breaking News

सरकारचे काम व्यापार करणे नाही

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत; अर्थसंकल्प सर्वंकष असल्याची भाजप नेत्यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

खाजगीकरण झाल्यामुळे ग्राहकांना फायदा झाला. सरकारचे काम व्यापार करणे नाही, अशी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. एलआयसीचा खासगीकरण होत असल्याची टीका केली जात आहे. खाजगीकरण झाल्यामुळे ग्राहकांना फायदा झाला. आधी दिल्ली ते मुंबई एअर इंडियाचे तिकीट होते तेव्हा 24000 होते. 71 हजार कोटी रुपयाची विमाने काँग्रेसच्या काळात खरेदी केली. त्यामुळे एअर इंडिया डुबली. त्याऐवजी महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांसाठी पाणी दिले असते तर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या नसत्या, असंही गडकरी म्हणाले. प्राथमिक कशाला द्यायची हे ठरवावे लागेल. हा केंद्रीय अर्थसंकल्प नोकर्‍या निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे. फाईव्ह ट्रिलीयन इकॉनॉमी कशी होणार याचा मास्टर प्लॅन या बजेटमध्ये आहे. 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न नक्की दुप्पट करू. 2023 पर्यंत मुंबई दिल्ली महामार्ग पूर्ण होणार असल्याचे देखील ते म्हणाले. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, हा अर्थसंकल्प कृषी, सिंचन आणि  ग्रामीण विकास यावर भर देणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे देश प्रगतीपथावर जाईल, असे त्यांनी म्हटलं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या सूत्रावर आधारित केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला असून त्याचे आम्ही स्वागत करतो. पर्यटन आणि मासेमारी क्षेत्रासाठी हाती घेतलेल्या योजनांचा फायदा गोव्याला होईल यात दुमत नाही, अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

सुधारणावादी अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस

नव्या दशकाकडे वाटचाल करताना आधुनिकतेची कास धरत भारताला नवभारताकडे नेणारा हा सुधारणावादी अर्थसंकल्प आहे. शेती आणि शेतकर्‍यांच्या समस्यांवर मुळापासून उपचाराचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि कृषी विकासातील अडथळे दूर करण्यासाठी उत्पादन, कृषी मालाची वाहतूक, बाजारपेठ, निर्यात अशा सर्वच बाबतीत ठोस निर्णय घेण्यात आले आहेत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

सर्व घटकांची काळजी घेणारा अर्थसंकल्प : पाटील

शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीची सोळा कलमी योजना, प्रत्येक घराला पिण्याचे पाणी मिळण्याच्या पंतप्रधानांच्या निर्धारासाठी भक्कम आर्थिक तरतूद, जिल्हा रुग्णालयांना जोडून प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची कल्पक योजना, इन्कम टॅक्समध्ये कपात करून मध्यमवर्गीयांना दिलासा, अनुसूचित जाती-जनजाती-ओबीसी यांच्या कल्याणासाठी भक्कम आर्थिक तरतूद ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. समाजाच्या आकांक्षा पूर्ण करणे, देशाची अर्थव्यवस्था भक्कम करणे आणि दुर्बल घटकांची काळजी घेणे यावर या अर्थसंकल्पाचा भर आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply