खारघर : रामप्रहर वृत्त
भारत रक्षा मंच या संघटनेचा दशकपूर्ती सोहळा खारघर येथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत शनिवारी (दि. 27) साजरा करण्यात आला. मंचची स्थापना सन 2010मध्ये भोपाळ येथे केली गेली होती.
’बांगलादेशी घुसखोरी : देशावरील मोठे संकट’ या परिचर्चेतून सूर्यकांत केळकर यांनी संघटनेची स्थापना केली व आज देशातील 24 राज्यांमध्ये संघटनेचा विस्तार झालेला आहे. एनआरसी, जनसंख्या नियंत्रण कायदा, शिक्षणाचे भारतीयकरण, घुसखोरविरोधी कायदा अशा देशहिताच्या विविध विषयांवर संघटना कार्यरत आहे.
भारत रक्षा मंचला शनिवारी 10 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बिना गोगरी यांनी आपल्या कार्यालयात स्थापना दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कोरोनाची सद्यपरिस्थिती पाहता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मंचचे संघटन मंत्री प्रशांत कोतवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी मंचची 10 वर्षांची यशस्वी वाटचाल व आगामी योजना याबद्दल सविस्तर माहिती दिली. गलवान खोर्यातील वीर हुतात्म्यांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमास मंचचे नाशिक जिल्हा संयोजक भूषण तिलक, राजेंद्र अग्रवाल, आर. के. दिवाकर, नरेंद्र शर्मा, संजय सिंह, दिनेश पटेल, दीपक सिंह, अंजू आर्या, निर्मला यादव, गीता पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.