Breaking News

डॉक्टर नसल्याने बालकाचा मृत्यू; सुकेळीतील जिंदाल रुग्णालयाला ठोकले टाळे

नागोठणे : प्रतिनिधी

सुकेळी येथील महाराष्ट्र सिमलेस कंपनीच्या अंतर्गत असणार्‍या बी. सी. जिंदाल चॅरिटेबल ट्रस्टच्या जिंदाल रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने येथे उपचारासाठी आणलेल्या तीन महिन्यांच्या आदिवासी बालकाचा रविवारी (दि. 2) मध्यरात्री दुर्दैवी मृत्यू झाला. पुढील उपचारासाठी कंपनीच्या रुग्णवाहिकेतून पनवेलला नेत असताना महामार्गावर वडखळनजीक त्याला मृत्यूने गाठले. ही घटना कळल्यावर संताप अनावर झालेल्या ग्रामस्थांनी रुग्णालयाला टाळे ठोकल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत सविस्तर माहिती देताना स्थानिक ग्रामपंचायत सदस्य मनोहर सुटे यांनी सांगितले की, रात्री 11.30 ते 12च्या दरम्यान सुकेळी येथील किशोर तेलंगे यांचा फोन आला. त्यांनी त्यांच्या सहा वर्षीय पुतण्याच्या गालाला काहीतरी चावले असून, त्याला जिंदाल रुग्णालयात उपचारासाठी आणले आहे असे सांगितल्याने तातडीने या रुग्णालयात आलो. त्याच दरम्यान येथील गणपतवाडी या आदिवासीवाडीतील तीन महिन्यांच्या बालकाला रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते, मात्र येथे एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याचे तेथील कर्मचार्‍याने सांगितले. त्याचवेळी स्थानिकांची गर्दी वाढत असल्याचे दिसून आल्याने काही प्रकार घडू नये म्हणून प्रशासकीय अधिकारी भरोसे यांना फोन केला असता, त्यांनी उचलला नसल्याने कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना फोन केला, मात्र सर्वांचेच फोन स्विच ऑफ होते. तेव्हा कंपनीच्या टेलिफोन ऑपरेटरला फोन करून कंपनीचे सुरक्षा रक्षक येथे पाठविण्यास सांगितले व नागोठणे पोलीस ठाण्यात फोन करून पोलिसांना पाचारण केले.

बालकाला पुढे नेण्यासाठी कंपनीची रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यावर त्याला नागोठण्यातील कोकणे रुग्णालयात नेले. तेथून लगेचच त्याला पनवेलच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले, मात्र या बालकाला रस्त्यातच मृत्यूने गाठले. त्यामुळे संताप अनावर झालेल्या ग्रामस्थांनी मध्यरात्री रुग्णालयाला टाळे ठोकले. सकाळी 11च्या सुमारास व्यवस्थापनाकडून विनंती करण्यात आल्याने ही अत्यावश्यक सेवा असल्याने सर्वांनी निर्णय घेऊन रुग्णालयाचे कुलूप खोलले, असे सुटे यांनी सांगितले.

कंपनी व्यवस्थापनाकडून आज ग्रामस्थांची बैठक

यासंदर्भात महाराष्ट्र सिमलेस कंपनी व्यवस्थापनाकडून चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली असून, या वेळी झालेला प्रकार व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. दरम्यान, झालेल्या घटनेबाबत रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी राहुल भरोसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply