Breaking News

छत्रपती शिवरायांच्या समाधीपुढे राज्यपाल नतमस्तक; किल्ले रायगडची केली पाहणी

महाड : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असून, रविवारी (दि. 2) दुपारी त्यांनी किल्ले रायगडला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे ते नतमस्तक झाले.

राज्यपालांचे महाड एमआयडीसीतील हेलिपॅडवर आगमन झाल्यावर तेथून ते पाचाड येथे आले. तेथे त्यांनी राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते रोप वेने गडावर गेले. त्यांनी गडावरील शिवसमाधी तसेच जगदिश्वराचे दर्शन घेतले. होळीचा माळ व मेघडंबरीतील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून भगवा झेंडा हातात घेऊन जयघोषही केला. या वेळी गडावर आलेल्या पर्यटकांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. आपल्या या छोट्याशा भेटीत पत्रकारांशी बोलताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज जे स्वप्न उराशी बाळगून निघाले होते, ते स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. राज्यपालांच्या या दौर्‍यादरम्यान त्यांच्यासोबत जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, कोकण आयुक्त शिवाजी दौंड, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार, नायब तहसीलदार प्रदीप कुडळ आदी अधिकारी उपस्थित होते.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply