Breaking News

राज्याच्या गुंतवणुकीस धोका

मुख्यमंत्र्यांच्या हतबलतेवर भाजपची टीका

मुंबई : प्रतिनिधी
राज्याची आर्थिक परिस्थिती हे मोठे आव्हान असून पैशाचे सोंग करता येत नाही, अशी हतबलता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारच्या मुलाखतीत व्यक्त केल्यामुळे राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. याचा विपरित परिणाम राज्यात नवी गुंतवणूक येण्यावर आणि रोजगार निर्मितीवर होणार आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली आहे.
राज्यात नवी गुंतवणूक येण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे सबळ व सक्षम चित्र निर्माण होणे गरजेचे असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हतबलता व्यक्त करतात. 2014मध्ये केंद्रात आणि राज्यात परिवर्तन झाल्यानंतर चुंबकीय शक्ती निर्माण झाली आणि राज्यात मोठ्या प्रमाणात नवे उद्योग येण्यासाठी एमओयू झाले, असे त्यांनी मुलाखतीत मान्य केले आहे, पण उद्योग परत गेले असे सांगून त्यांनी आपल्याच शिवसेनेकडे असलेल्या उद्योग खात्याचे अपयशही सांगितले आहे. एमआयडीसी ओस पडल्या आहेत, असे ते म्हणतात. त्या वेळीही त्यांच्या पक्षाचे नेते सुभाष देसाई उद्योगमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण अपयशी ठरल्याचेच ते कबूल करतात. अशा प्रकारचे निराशाजनक आणि हतबल चित्र मुख्यमंत्रीच मांडत असताना राज्यात नवी गुंतवणूक कशी येणार, असा सवाल भंडारी यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री या नात्याने राज्यासमोरच्या समस्या सोडविण्याचे आव्हान आत्मविश्वासाने पेलण्याऐवजी उद्धव ठाकरे सत्तेच्या पहिल्या दोन महिन्यांतच हतबलता व्यक्त करतात आणि आपल्या अपयशाचे खापर इतर कोणावर तरी फोडू पाहतात, हे आश्चर्यकारक आहे.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत दिली पाहिजे, असे ठाकरे यांनीच स्वतः मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यापूर्वी सांगितले होते, पण आता राज्याच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर दोन महिने पूर्ण झाले तरी ते आता ही मदत देण्याचे नाव काढत नाहीत. उलट केंद्राकडून पैसे मिळाले तर शेतकर्‍यांना वेळेवर पैसे देता येतील, असा उधारीचा वादा करतात. त्यांनी मुळात 25 हजारांचे वचन केंद्र सरकारच्या भरवशावर दिले होते का, हे त्यांनी आधी सांगितले पाहिजे. कर्जमाफीचाही त्यांनी उधारीचा वादा केला असून, आता आपण दोन महिने मुदत मागितल्याचे त्यांनी मान्य केले आहे, याकडे भंडारी यांनी निदर्शनास आणले आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply