गोेरेगावमधील नायडू प्री स्कूलची रॅली; कापडी पिशव्यांचे वाटप
माणगाव : प्रतिनिधी
नायडू प्री स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी माणगाव तालुक्यातील गोरेगावमध्ये प्लास्टिक बॅगविरोधात रॅली काढून पर्यावरण रक्षण व संवर्धनाचे आवाहन केले, तसेच कापडी पिशव्यांचे वाटप केले. गोरेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर नायडू प्री स्कूलच्या चिमुकल्यांनी सरपंच जुबेर अब्बासी व ग्रामपंचायत कर्मचार्यांसमोर नाटुकली सादर करून या रॅलीची सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी, गाडगे महाराज यांची वेषभूषा करून पर्यावरण रक्षणाचे व प्लास्टिकबंदीचे आवाहन केले. त्यानंतर घोषवाक्य असलेले फलक घेऊन गोरेगाव शहरात रॅली काढली. या वेळी विद्यार्थ्यांनी प्लास्टिक हटाव, पर्यावरण बचाव, प्लास्टिक पिशवी दूर सारा, कापडी पिशवी जवळ करा, अशा घोषणा दिल्या. चौकाचौकात पथनाट्ये सादर केली. या वेळी नायडू प्री स्कूल, प्रवीण लोणचे, चोरडिया फूड्स यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.