Breaking News

शेतांमध्ये कडधान्य पीक तयार

नागोठणे : प्रतिनिधी

नागोठणे-निडीचा प्रसिद्ध म्हणून ओळख असलेल्या वाल, पावटा या कडधान्यांची पिके काहीअंशी उशिरानेच तयार झाली असल्याने शहरातील खवय्यांमध्ये पोपटीच्या सिझनला सुरुवात झाली आहे.

डिसेंबरदरम्यान अचानक पाऊस पडल्याने या भागात लावलेल्या वाल, पावटा या कडधान्यांच्या पिकाला धोका पोहोचला होता. लावलेली पिके काही ठिकाणी नष्ट झाल्याने काही शेतकर्‍यांना या पिकांची पुन्हा लागवड करावी लागली होती. काही शेतांमध्ये पिके बहरली असली तरी, वेलांवर फुलेच आली नसल्याने शेंगाच आल्या नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

नागोठणे भागात ओलसर जमिनीतच वाल, पावट्याचे पीक घेतले जाते व साधारणतः तीनशे ते चारशे एकर जमिनीत या पिकांची लागवड केली जाते. मात्र या वेळी पन्नास टक्केच पीक आले असल्याचे शेतकरी सांगतात.

आठ दिवसांपासून वाल पावट्याच्या शेंगा नागोठणे शहरात विकायला यायला सुरुवात झाली असून सुरुवातीला किलोचा भाव दीडशे रुपये इतका होता. मात्र चारपाच दिवसांतच भाव शंभर रुपये इतका घसरला असून हाच भाव यापुढेही स्थिर राहील असे जाणकार सांगतात.

नागोठणे शहरासह विभागात वाल किंवा पावट्याच्या शेंगांची ’पोपटी’ करणे म्हणजे एक पर्वणीच असते. काही अंशी उशिरानेच या शेंगा उपलब्ध झाल्या असल्याने पोपटीकडे डोळे लावून बसलेल्या खवय्यांचा जीव  भांड्यात पडला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply