Breaking News

भारताचा धावांचा डोंगर ‘किवीं’कडून सर

पहिल्या वन डेत न्यूझीलंडची विजयी सलामी

हॅमिल्टन : वृत्तसंस्था
एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने उभारलेला 347 धावांचा डोंगर न्यूझीलंडच्या संघाने सहा गड्यांच्या मोबदल्यात सर केला. रॉस टेलरची झुंजार शतकी खेळी आणि हेन्री निकोल्स, टॉम लॅथम यांच्या अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने चार गडी व 1.5 षटके राखून हा सामना जिंकला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या भारतीय संघाने न्यूझीलंडपुढे 347 धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. भारताकडून श्रेयस अय्यरने धडाकेबाज शतक ठोकले, तर कर्णधार विराट कोहली व के. एल. राहुल यांनी अर्धशतके झळकावली. भारताची धावसंख्या पाहता हा सामना एकतर्फी होईल की काय अशी शंका होती, मात्र टी-20तील पराभवानंतर विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. शेवटच्या षटकांमध्ये न्यूझीलंडचे दोन फलंदाज झटपट बाद झाल्याने भारताच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, पण शतकवीर टेलरने अखेरपर्यंत किल्ला लढवत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. टेलरने 84 चेंडूंत नाबाद 109 धावा कुटल्या, तर निकोल्स व लॅथम यांनी
अनुक्रमे 78 व 69 धावा केल्या. त्यांना मार्टिन गप्टील (32) याने चांगली साथ दिली. भारताकडून कुलदीप यादवने दोन बळी टिपले, तर मोहम्मद शमी व शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
32 वर्षांनंतर श्रेयसचा पराक्रम
मुंबईकर श्रेयस अय्यरने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या वन डे सामन्यात 347 धावांपर्यंत मजल मारली. अय्यरच्या 103 धावांच्या खेळीत 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. अय्यरच्या या शतकाने तब्बल 32 वर्षांनी न्यूझीलंडच्या भूमीवर भारतीय फलंदाजाने अनोख्या विक्रमाची नोंद केली. सन 1988मध्ये मोहिंदर अमरनाथ यांनी ‘किवीं’विरुद्ध चौथ्या क्रमांकावर येत 102 धावांची खेळी केली होती.
राहुलने मोडला धोनीचा विक्रम
न्यूझीलंडविरुद्ध श्रेयस अय्यरव्यतिरिक्त मधल्या फळीत के. एल. राहुलनेही न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. 64 चेंडूंत राहुलने तीन चौकार आणि सहा षटकारांसह 88 धावा केल्या. या खेळीदरम्यान राहुलने महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला. न्यूझीलंडमध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या यष्टीरक्षकाचा मान आता राहुलला मिळाला आहे. त्याने धोनीचा 85 धावांचा विक्रम मोडीत काढला.
विराटने केली सचिनची बरोबरी
भारताचा कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक करून माजी खेळाडू सचिन तेंडुलकरशी बरोबरी केली. न्यूझीलंडविरुद्ध वन डे सामन्यांत विराटचे हे 13वे अर्धशतक ठरले. यासोबतच भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम विराटने मोडला. कर्णधार या नात्याने वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत विराट आता तिसर्‍या स्थानी पोहचला आहे. त्याने गांगुलीचा पाच हजार 82 धावांचा विक्रम मोडला.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply